सावंतवाडी: शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी आंबोली येथील फूलपाखरु उद्यान, कावळेसाद, नांगरतास पॉईंटला भेट दिली.आंबोली येथील फूलपाखरु उद्यान विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून वन विभागाने वन संशोधन केंद्राशी करार करावा, अशी सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ज्या झाडा भोवती फूलपाखरु येतात अशांची लावगड करावी. होस्ट प्लांटची देखभाल करायला हवी. जैवविविधता भरपूर असल्याने याठिकाणी संशोधन केंद्र उभे करण्याचे नियोजन आहे. जंगल सफारी करण्यासाठी माजी सैनिक, स्थानिक तरुण यांचे सहकार्य वन विभागाने घ्यावे. प्रसिध्द शास्त्रज्ञ मार्सेलिन अल्मेडा यांनी संग्रहित केलेले पानाचे विविध प्रकाराचा अभ्यास घडविणारे “हार्बेरियम सेंटर” उभारण्यात येणार आहे. दांडेलीच्या धर्तीवर पर्यावरण केंद्र ट्री हाऊस, मड हाऊस यांचे नियोजन करावे.
कावळेसाद येथील साहसी क्रीडा पर्यटन केंद्र करण्याबाबतही यावेळी सूचना केल्या. आंबोली येथील कावळेसाद पॉईंटला भेट दिल्यानंतर ते म्हणाले, कावळेसाद पॉईंट हा सिंधुदुर्गच्या पर्यटनाच्या दृटीने अत्यंत महत्वाचं स्थळ आहे. दरम्यान पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या आंबोली येथील अन्य पर्यटन प्रकल्प लवकरच सुरू केले जातील, त्यासाठी आवश्यक असलेला निधी आपण तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असेही श्री. केसरकर म्हणाले.
नांगरतास पॉईंट, कावळेसाद येथे मुंबई, नवी मुंबई, नाशिक या भागातून आलेल्या पर्यटकांशी संवाद साधत त्यांनी विचारपूस केली. त्याशिवाय पर्यटक म्हणून आलेल्या सूचनांचे स्वागतही त्यांनी केले. त्या सूचनांवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या समक्ष दिले. यानंतर पर्यटकांनी आनंदाने मंत्री महोदयांच्या सोबत छायाचित्र आणि सेल्फीचा आनंद घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, एमटीडीसीचे कार्यकारी अभियंता विनय वावधने, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, सहायक वनसंरक्षक वर्षा खरमाटे, क्षेत्रिय वन अधिकारी विद्या घोडके, तहसिलदार श्रीधर पाटील, सरपंच सावित्री पालेकर, गेळेचे सरपंच अंकुश कदम उपस्थित होते


