कणकवली: शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे हे दोन दिवसांपासून पोलिस कोठडीत आहेत. आज त्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नितेश राणे यांचे वकील आज सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहेत. या याचिकेवर शनिवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सुनावणीनंतर पोलिसांना नितेश राणेंच्या कोठडीत वाढ करायची होती. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यामागे आर्थिक व्यवहाराशी काही संबंध आहे का, याचासाठी नितेश राणे यांना पोलिस तपासासाठी पुण्याला न्यावे लागणार आहे. तसेच नितेश राणे यांनी हल्ला करण्यापूर्वी मुख्य आरोपी सचिन सातपुते याला संतोष परब यांचा फोटो पाठवला होता.परंतु नितेश राणेंनी असे केल्याचे नाकारले आहे. या सर्व कारणांसाठी नितेश राणे यांची चौकशीकरण्यासाठी पोलिसांना अजून आठ दिवसांची पोलिस कोठडी हवी आहे, असेही सरकारी वकिलांनी सांगितले.


