सिंधुदुर्ग – मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 प्रदर्शना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

0
97

ओरोस: मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 प्रदर्शनात मालवण नगरपरिषदेची आज पर्यटन दिंडी निघाली. डौलाने फडकणारा जरीपटका, ढोल-ताशांच्या गजरात, भरजरी पोशाखात सजलेले मालवणवासीय, ऐतिहासिक-पौराणिक देखाव्यांच्या जल्लोषी थाटात आज पर्यटन दिंडी निघाली. प्रशासाक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या दिंडीला सुरुवात झाली.

यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी अवधूत तावडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ प्रमुख उपस्थित होते. सजवलेल्या रिक्षा, बैलगाड्या, उंट, घोडे, मानवी कोंबडे, पोपट आणि मोर यांनी दिंडीत आगळा रंग भरला. उंटावर स्वार झालेला श्रीकृष्ण, घोड्यावर स्वार झालेली चिमुकली आणि भगवान शिवशंकराची वेशभूषा केलेला बालक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.शहरातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने या दिंडीत उत्साहाने सहभागी झाले होते. हजारो मालवणवासीय आणि बाहेरुन आलेल्या पर्यटकांनी दिंडीचा हा सोहळा आपल्या डोळ्यात आणि मोबाईलमध्ये साठवून घेतला.

या दिंडीच्या माध्यमातून नगर परिषद प्रशासनाने मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या नेतृत्वाखाली कल्पक आणि नेटक्या नियोजनाचे दर्शन घडवले. अपूर्व उत्साहाने हजारोंच्या संख्येने सहभागी झालेला जनसमुदाय त्याची साक्षच देत होता. अशा प्रकारचा हा पहिलाच महोत्सव असला तरी प्रशासनाने त्याला दणक्यात सुरुवात केली. दिंडीने या पर्यटन महोत्सवाचा मंगल आणि जल्लोषी प्रारंभ केला. भरड नाका ते नगर परिषद अशा या दिंडीने मालवण नगरी दुमदुमून गेली.

आजच्या या दिंडीने १३, १४ आणि १५ मे रोजी दांडी किनारा पर्यटकांच्या उदंड प्रतिसादाने गजबजून जाईल, याची खात्रीच पटली. मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 अंतर्गत दांडी बीच येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन सन्मेश परब, महेंद्र पराडकर, शील्पा खोत यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा खुल्या गटात घेण्यात आली.रांगोळी स्पर्धेसाठी स्पर्धकांना “माझी वसुंधरा” हा विषय देण्यात आला होता. श्रीकृष्ण मदिर दांडी येथे सकाळी 10 वाजता रांगोळी स्पर्धेला सुरुवात झाली. एकूण चार स्पर्धकांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी श्रीमती शील्पा खोत व श्रीमती सोनाली हळदणकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहीले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here