सिंधुदुर्ग – मासिक सभेत आमदारांच्या बंडखोरीबाबत चर्चा

0
53

वेंगुर्ला प्रतिनिधी-

वेंगुर्ला तालुका शिवसेना पक्षाची तालुका कार्यकारिणीची मासिक सभा शिवसेना तालुका मध्यवर्ती कार्यालयात तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी सदर सभेच्या अनुषंगाने सद्यस्थितीत शिवसेना पक्षाची असलेली राजकीय परिस्थिती व राजकीय घडामोडीतील शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीबाबत तसेच विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, उमेश नाईक, शितल साळगावकर, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, संजय परब, संजय फर्नांडिस, गजानन गोलतकर, वायंगणी सरपंच सुमन कामत, सामाजिक कार्यकर्ते निलेश चमणकर, दिगंबर पेडणेकर, शैलेश परुळेकर, अभिनव मांजरेकर, दादा सारंग, संदिप पेडणेकर, आनंद बटा, शिल्पा वस्त, स्नेहा साळगावकर, वंदना कांबळी, कोमल सरमळकर, अरुणा माडये, रश्मी गावडे, सीमा गावडे, सावली आडारकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. 

सद्यस्थितीत शिवसेना पक्षाची राजकीय परिस्थिती व राजकीय घडामोडीतील शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने या विभागाचे आमदार दिपक केसरकर यांना वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीने दोन्ही वेळा चांगले मताधिक्य देण्याचे काम शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पार पाडले. तसेच स्वतः आमदार केसरकर हे सुद्धा नेहमी सांगत असायचे की, सावंतवाडी मतदारसंघांमध्ये ३ टर्म अद्यापपर्यंत कोणी निवडून आला नाही. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ४ हजार ५०० चे मताधिक्याचे लीड देऊन विजय मिळविण्यास ते यशस्वी झाले होते. तिस-या टर्मला त्यांना निवडून आणण्यासाठी वेंगुर्ला तालुक्याने विजयाची मुहूर्तमेढ रोवली होती. परंतु, हे सर्व विसरुन आमदार दिपक केसरकर यांनी कुठल्याही संघटनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकाचा विचार न करता ते शिंदे गटात सामील झाले, त्याची खंत व रोष शिवसैनिकांनी या सभेत व्यक्त केला. विधानसभा मतदारसंघाला कुठल्याही प्रकारचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व नसले तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संफप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संफप्रमुख शैलेश परब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कालावधीत होणा-या जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आदी निवडणुकीत १०० टक्के यश प्राप्त करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली.

गेले सात-आठ दिवस होणा-या पूर्वसदृश्य परिस्थितीमुळे आसोली येथे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान तौक्तेवेळी ठाकरे सरकारने दिलेली मदत त्या पटीत सद्यस्थितीत शासनाने मदत देण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. तशा प्रकारचे पत्र तहसिलदार यांना देण्याचे सुचित करण्यात आले. तौक्ते वादळाच्या वेळी झालेली सुमारे १ कोटी ७० लाख रुपये नुकसान भरपाई शेतक-यांना अद्यापपर्यंत मिळालेली नाही. केवळ आश्वासने देण्यात आली आहेत. तसेच नोव्हेंबर २०२१ मध्ये मठ महसुली गावातील चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत दिलेली नाही. या सर्व मुद्द्यांचा विचार करता नुकसान भरपाई प्राप्त न झाल्यास शिवसेनेमार्फत आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे यशवंत परब यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here