कणकवली / भाई चव्हाण
कणकवली: मुंबई-कोकण-गोवा हा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०२० पर्यंत पुर्ण होणे अपेक्षित होते. पश्चिम किनारी सागरी महामार्गावरील काही पुलांसाठी अद्यापही निधीची तरतूद केलेली नाही. या दोन्ही महामार्गामुळे कोकणच्या पर्यटन विकासासह देशाच्या संरक्षणासाठी फायदा होणार आहे. तरी या दोन्ही महामार्गांच्या पुर्ततेसाठी कोकणातील आमदार-खासदारांनी पक्षभेद विसरून केंद्रासह राज्य शासनाकडे एकत्रितपणे पाठपुरावा करावा, असे आग्रही मत कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी दादर-मुंबई येथे केले.
कोकण विकास आघाडीच्या कार्यकारिणीची बैठक मुंबई दादर येथील मुख्य कार्यालयात झाली. त्यावेळी केळुसकर बोलत होते. यावेळी सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब परब, मनोहर डोंगरे, प्रकाश तावडे, चंद्रकांत आंब्रे, गणपत चव्हाण, विलास गांगण, सुरेश गुडेकर आदी उपस्थित होते.
मुंबई-कोकण-गोवा चौपदरीकरण आणि पश्चिम किनारी सागरी महामार्गांसाठी कोविआ १९७८ सालापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मुंबई-कोकण-गोवा या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक कारणांमुळे रखडत चालले आहे. केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत खंत व्यक्त केली आहे, असे सांगून ते म्हणाले, पश्चिम किनारी सागरी महामार्गाला राज्य शासनाने समृद्धी महामार्गाचा दर्जा दिला आहे. निधीची तरतूदही केली आहे. मात्र अद्यापपर्यंत या महामार्गावरील खाडींच्या लांब पुलांबाबत ठोस पावले उचलली नाहीत. लोकप्रतिनिधी अपेक्षित पाठपुरावा करताना दिसत नाहीत. राज्यातील अन्य भागातील समृद्धी महामार्ग लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे वेळीच पुर्ण होतात. त्यामुळे आता तरी कोकणातील लोकप्रतिनिधींनी हे महामार्ग जलदगतीने पुर्ण करुन घेण्यासाठी पक्षभेद विसरून प्रयत्न करायला हवे.


