वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कोलगेकर
वेंगुर्ला: तालुक्यात आज सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत मोठी वाढ पाहायला मिळाली. यामुळे ठिकठिकाणी नदी ओहोळांचे पाणी रस्त्यावर येऊन काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. तर या पावसामुळे एकूण सुमारे २ लाख ५ हजार ४०० रुपयांचे नुकसान दाखल झाल्याची महिती आपत्ती कक्षाकडून देण्यात आली.
वेंगुर्ला तालुक्यात सोमवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे ग्रामीण भागासहीत शहरात ठिकठिकाणी खाडी, नदी, ओहोळांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर शेतमळ्यात पाणी साचून राहिल्याने शेतीची कामेही ठप्प झाली. होडावडा- तळवडे नदीवर पाणी आल्याने या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. तर सायंकाळ पर्यंत वेंगुर्ला डेपोतून एस.टी.बस सेवा होडावडा पर्यंतच सुरू ठेवण्यात आली असल्याची माहिती वेंगुर्ला एसटी आगाराकडून देण्यात आली.
या मुसळधार पावसामुळे शहरातील कॅम्प परिसरात गटारांचे पाणी रस्त्यावर आले होते. पॉवरहाऊस येथील चौकात चारही बाजूंनी गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने येथील शिरोडकर यांच्या दुकानात पाणी शिरले. तर येथीलच तांडेल कुटुंबीय यांचे आंब्याचे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कर्मचा-यांनी हे झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
शहरातील पाटीलवाडा येथील जिवाजी कृष्णा सुतार यांची घराची भिंत व छप्पर पडून सुमारे ३३ हजारांचे नुकसान झाले. तर मठ-गावठणवाडी ते स्वयंभू मंदिरकडे जाणा-या रस्त्यावरील पुलानजिकचा रस्ता कोसळल्याने सिद्धार्थनगर व परबवाडा जाणा-या लोकांसाठी फक्त दुचाकीसाठी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. आडेली-भंडारवाडी येथील सुलोचना विश्वनाथ मुंडये यांच्या घराची भिंत पडून सुमारे ३५ हजारांचे नुकसान झाले. केळुस – कालवीमधील दाडोबा देवस्थानकडील रस्ता खचल्याने वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची माहिती तहसील आपत्ती विभागाकडून देण्यात आली.


