दापोली– कोणत्याही परीक्षेत किंवा स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा समाजाने गुणगौरव करणे हे फार मोठ्या समाजभानाचे लक्षण आहे. अशा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक वाढण्यासाठी आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी असे गुणगौरव सोहळे साजरे होणे आवश्यक आहे. मात्र अशा यशस्वी विद्यार्थ्यांनीही आयुष्याच्या पुढील महत्वाच्या टप्प्यावर या समाजभानाची, गुणगौरवाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे असे मत कोकणातील प्रथितयश साहित्यिक व उपक्रमशील शिक्षक बाबू घाडीगांवकर यांनी प्रभूआळी, दापोली येथील विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात व्यक्त केले.
दापोली शहरातील प्रभूआळी येथील श्रीराम क्रीडा मंडळाने नुकतेच गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे श्रीराम मंदिरात आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना बाबू घाडीगांवकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण पतपेढीचे अध्यक्ष तथा श्रीराम देवस्थानाचे अध्यक्ष राकेश कोटीया हे होते. याशिवाय व्यासपीठावर प्रभूआळी महिलामंडळ अध्यक्षा सानिका शिंदे, श्रीराम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष साहिल सणस, कुणबी पतपेढीच्या अध्यक्षा मंगल सणस आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रभू आळीतील इयत्ता दहावी, बारावी, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, नासा ऑलिंपियाड, ज्युडो, सायकलींग, साहित्य लेखन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला.
यावेळी मंगल सणस, राकेश कोटीया यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीराम क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष प्रथमेश घाग, सचिव शुभम गवळी, खजिनदार जयवंत चव्हाण, अभि चव्हाण, संदेश घाग, परेश घाग, श्रेयश खटावकर व सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.