वेंगुर्ला प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस वेंगुर्ला भाजपातर्फे विविध सेवा कार्य आयोजित करुन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर व कोवीड लसीकरण, कृत्रिम अवयव वितरण, वयोश्री योजनांचे कॅम्प, बुद्धीजीवी संमेलन, व्होकल फॉर लोकल, स्वच्छ भारत अभियान, जल ही जिवन, वृक्षारोपण, तलाव स्वच्छ करणे, प्लॅस्टिक मुक्ती अभियान, आत्मनिर्भर भारत, एक भारत श्रेष्ठ भारत इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे
दि.१७ ते २ ऑक्टोबर या कालावधीत होणा-या कार्यक्रमांसाठीची नियोजन बैठक प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या उपस्थितीत तालुका कार्यालयात संपन्न झाली. यावेळी प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर दिलीप गिरप, अॅड.सुषमा खानोलकर, स्मिता दामले, साईप्रसाद नाईक, वसंत तांडेल, बाळा सावंत, बाबली वायंगणकर, शितल आंगचेकर, प्रशांत आपटे, श्रेया मयेकर, कृपा गिरप, मनोज उगवेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपाने दिलेली १७ सेवाकार्य कशा पद्धतीने करावी याबाबत प्रसन्ना देसाई यांनी मार्गदर्शन केले. २ ऑक्टोबर रोजी स्वदेशी, खादी, स्वावलंबन, साधेपणा आणि स्वच्छता याबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून खादीचा प्रसार होण्यासाठी खादीचे कपडे जास्तीत जास्त नागरिकांनी खरेदी करावेत यासाठी जनजागृती अभियान राबविण्याचे नियोजनही केले आहे.
फोटोओळी – सेवाकार्य नियोजनाच्या बैठकीत प्रसन्ना देसाई यांनी मार्गदर्शन केले.


