वेंगुर्ले प्रतिनिधी –
वेंगुर्ले-बेळगाव राज्य मार्गावर खड्डे पडल्याने या रस्त्याची दुरुस्ती करणाचे काम करून डांबरीकरण करावे तसेच वेंगुर्ले आडेली माणगाव ते शिवापूर चंदगड कोल्हापूर हा रस्ता व्यापार व पर्यटन वाढीसाठी त्याला निधी मंजूर करावा अशी मागणी शिंदे गट शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख व शिक्षणमंत्री दिपक केसरकर ह्यांचे निकटवर्तीय नितीन मांजरेकर यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने डोंबिवली येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन नितीन मांजरेकर यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या समवेत गजानन बांदिवडेकर , बाळू सावंत,सचिन होडावडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. वेंगुर्ले-मठ मार्गे सावंतवाडी-आंबोली ते बेळगाव हा हा मुख्य रस्ता यावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. कोकणात अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रस्ते वाहन चालकांना वाहन चालवण्याकरता उपयुक्त राहिलेले नाहीत. त्याच रस्त्यातील वेंगुर्ले-सावंतवाडी, आंबोली-बेळगाव हाही रस्ता खड्डेमय झाल्याने वाहन चालकांना वाहने चालवताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आंबोली हे प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने त्याच बरोबर कोकणात कडधान्य अन्नपुरवठा हा याच मार्गाने होत असल्याने ट्रकचालकांना या रस्त्या वर खड्डे असल्याने वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे व्यापारी व पर्यटन यांच्या विकासासाठी तातडीने वेंगुर्ले बेळगाव व वेंगुर्ले आडेली माणगाव शिवापूर कोल्हापूर हा नवीन रस्ता तातडीने मंजूर व्हावा अशी मागणी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.


