वेंगुर्ला प्रतिनिधी – भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सागरतीर्थ ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने विकास दिवसाच्या निमित्ताने स्वच्छता व श्रमदान या उपक्रमांतर्गत युवक-युवतींना संघटीत करत सागरतीर्थ किना-याची स्वच्छता करण्यात आली.
पर्यटन क्षेत्रांची शोभा कमी करणा-या, आरोग्यास हानिकारक व पर्यावरणास विघातक अशा स्वरूपातील कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रबर, थर्माकोल, प्लॅस्टिक तसेच काच आदी दीर्घकाळ किना-यावर टिकणा-या कच-याचा समावेश होता.
प्रतिष्ठानच्या या कार्याचा आढावा घेत ग्रामपंचायत, स्थानिक ग्रामस्थ, पर्यटक यांनी कौतुक करून सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी सागरतीर्थ ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी तसेच वेताळ प्रतिष्ठानचे बहुसंख्य सदस्य, युवा कला क्रीडा मंडळ पालचे सदस्य उपस्थित होते.
फोटोओळी – वेताळ प्रतिष्ठानच्या पुढाकाराने सागरतीर्थ किना-याची स्वच्छता करण्यात आली.


