सुलेखनकार अच्युत पालव यांचे ‘देवनागरी’ राज्यपालांच्या हस्ते प्रकाशित

0
94

भाषा व लिपीच्या बाबतीत भारत जितका समृद्ध आहे, तितका क्वचितच जगातील इतर कुठला देश आहे. अनेक पाश्चात्य भाषांना तर स्वतःची लिपीदेखील नाही. देवनागरी ही शास्त्रीय लिपी आहे असे सांगून देवनागरी लिपीच्या संवर्धन व प्रसाराचे अच्युत पालव करीत असलेले कार्य अलौकिक असल्याचे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी लिहिलेल्या ‘देवनागरी सुलेखनाचे मुलभूत ते व्यावसायिक उपयोग’ (Devnagari – Basic to Commercial Application of Calligraphy) या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

रोमन लीपिसह अनेक भाषांमध्ये सुलेखन केले जाते. मात्र देवनागरी लिपीत जसे बोलले तसेच लिहिता येते. सुलेखनाच्या माध्यमातून आज व्यावसायिक करिअर देखील करता येते. यास्तव सुलेखन या विषयाचा महाविद्यालयांमधून प्रचार प्रसार व्हावा, त्याविषयाचे मार्केटिंग व्हावे व त्यातून नवनवे विद्यार्थी घडावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

भारत हा जसा शेतीप्रधान देश आहे तसाच तो लिपीप्रधान देश आहे. लिपी ही संस्कृती आहे व लिपीचे सौंदर्य जनसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे अच्युत पालव यांनी सांगितले. यावेळी पालव यांनी राज्यापालांसमोर सुलेखनाचे प्रात्यक्षिक सादर केले.

कार्यक्रमाला पालव यांच्या पत्नी श्रद्धा पालव, लेखक प्रमोद पवार, निलेश देशपांडे, मनीष कासोदेकर व पालव यांचे विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here