देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया 6.7 टक्के व्याज दराने प्रथमच गृहकर्ज देत आहे. कोरोनाकाळात रोजगार आणि आजारपणामुळे त्रासलेल्या लोकांना यामुळे घर खरेदी करण्यासाठी एक दिलासा मिळणार आहे. मात्र या योजनेसाठी प्रत्येकाचा क्रेडिट स्कोअर पाहूनच हे कर्ज देण्यात येणार आहे. एसबीआयचे गृहकर्ज घेऊन तुम्ही 30 लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत घर खरेदी करू शकता. यापूर्वी एखाद्या व्यक्तीला घर खरेदी करण्यासाठी 75 लाखांपेक्षा जास्त कर्ज घ्यावे लागत असेल तर एसबीआयने व्याजदर 7.15 टक्के ठेवला होता.
सणासुदीच्या काळात सात बँका आणि एका हाऊसिंग फायनान्स कंपनीने ग्राहकांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. एचएसबीसी बँक आणि येस बँकही आता स्वस्त गृहकर्ज देत आहेत. खाजगी क्षेत्रातील एचएसबीसी बँकेने गृह कर्जाचा व्याजदर 0.10 टक्क्यांनी कमी करून 6.45 टक्के केला आहे. ही ऑफर गृहकर्ज दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करण्यासाठी आहे. हा व्याज दर बँकिंग क्षेत्रातील सर्वात कमी व्याज दरापैकी एक आहे. नवीन गृहकर्जासाठी एचएसबीसी बँक 6.70 टक्क्यांपासून व्याजदराने गृहकर्ज देत आहे.