२४ वर्षीय स्वप्निल लोणकर या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्यानंतर आख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसला आहे. पण आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमधून या व्यवस्थेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. परीक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून स्वप्निल मुलाखतीच्या प्रतिक्षेत होता. पण मुलाखतच झाली नसल्यामुळे तो प्रचंड तणावाखाली होता. आता त्यानं आत्महत्या केल्यानंतर राज्यातील इतर स्पर्धा परीक्षा देणारी मुलं थेट सरकारला जाब विचारू लागली आहेत.
“राजकीय नेत्यांना सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचं काही देणंघेणं नाही. या नेत्यांना केवळ स्वतःची मुलं सेट झाली पाहिजेत. एवढंच त्यांचं लक्ष आहे. मुख्यमंत्री साहेब, तुमचा २८ वर्षाचा मुलगा मंत्री होतो. पण आमच्या नियुक्तयांचं काय?”, असा परखड पण उद्विग्न सवाल या मुलांकडून विचारला जात आहे. राजकीय नेत्यांना सत्ता वाचविण्याचं पडलं आहे. पण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं काही नाही. त्यामुळे उद्या होणार्या अधिवेशनात विधानसभा आणि परिषदेतील आमदारांनी आमच्या समस्यांवर एकदा तरी प्रश्न विचारावा, अशी मागणी या परीक्षार्थींनी केली आहे. त्यामुळे आत राज्य सरकारकडून यावर नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, याकडे या हजारो परीक्षार्थींचं लक्ष लागलं आहे.