प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर
हवामानाचा अचूक अंदाज यावा यासाठी आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज येण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 हजार ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.
ज्यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होते, त्यावेळी विमा कंपन्या ह्या स्कायमेट कडूनच सर्व माहिती घेतात. आता ही व्यवस्था मंडळाच्या ठिकाणीच आहे. त्यामुळे तत्परता येत नाही. उद्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी अशा अत्याधुनिक हवामान केंद्राची उभारणी झाली तरी तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, पाऊस याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे कृषीविषयक सल्लाही शेतकऱ्यांना या माध्यमातून देण्यात येणार आहे. विशेषत: पीक विमा नुकसानभरपाईच्या दरम्यान याचा लाभ होणार आहे.


