हिंदीसोबत प्रादेशिक भाषांचा सन्मान व्हावा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
88

हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू व इतर भारतीय भाषांचे परस्परांशी वैमनस्य नाही. सर्व भाषांचा आत्मा एकच आहे. आज हिंदी भाषा देशाची सार्वभौम भाषा झाली असताना प्रत्येकाने प्रादेशिक भाषांचा सन्मान केला पाहिजे. महाराष्ट्रात राहून मराठी शिकली पाहिजे तसे बंगालमध्ये बंगाली भाषा शिकली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

‘आशीर्वाद’ या साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित २९ वे राजभाषा पुरस्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  केंद्र सरकारची कार्यालये, उपक्रम तसेच राष्ट्रीयीकृत बँका व वित्तीय संस्थांना हिंदी प्रचार प्रसारासाठी हे पुरस्कार देण्यात आले.

राज्यपालांच्या हस्ते अभिनेते व संगीत नाटक अकादमीचे माजी अध्यक्ष शेखर सेन व गीतकार समीर अंजान यांना कला साहित्य क्षेत्रातील हिंदी सेवी रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर पश्चिम रेल्वे, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयआयटी मुंबई, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय जीवन विमा निगम, आयडीबीआय, भारतीय कापूस महामंडळ, नाबार्ड, यांसह इतर संस्थांना विविध प्रवर्गातील राजभाषा पुरस्कार देण्यात आले.

आपण राज्यपाल पदाची शपथ मराठीतून घेतली तसेच राज्यातील विद्यापीठांचे पदवीदान समारोहांचे संचलन इंग्रजीऐवजी मराठी, हिंदी किंवा संस्कृत भाषेतून करावे यासाठी आग्रह धरला असे सांगताना शंभर वर्षांनी हिंदीसोबत संस्कृत भाषादेखील मोठ्या प्रमाणावर प्रचारात असेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी केंद्र शासनाची कार्यालये, राष्ट्रीय बँका व  केंद्र सरकारच्या उपक्रमांच्या सर्वोत्तम अंतर्गत गृहपत्रिकांनादेखील पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कन्सल, ‘आशीर्वाद’ संस्थेचे अध्यक्ष ब्रजमोहन अगरवाल, ज्येष्ठ साहित्यिक डॉ उमाकांत बाजपेई, नीता बाजपेई, डॉ अनंत श्रीमाली व साहित्यिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here