मीरा भाईंदर: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने मीरा भाईंदर येथे साकारण्यात आलेल्या स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालनाचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कलादालनाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या स्मृती अनोख्या पद्धतीने जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शिवसेनेची सुरुवात झालेली दादरची खांडके बिल्डिंग, बाळासाहेबांची व्यंगचित्रे, त्यांची भाषणे, त्यांचे विचार, त्यांनी केलेली आंदोलने, दुर्मिळ व्यंगचित्रे, छायाचित्रे आदी या दालनात आहेत. प्रत्यक्ष बाळासाहेब समोर उभे राहून आपल्याशी बोलत असल्याचा भास निर्माण होत असून हे सारे खरोखरच पाहण्याजोगे आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. मंत्री प्रताप सरनाईक यांनी माझ्याकडून सर्वाधिक निधी नेला, मात्र या निधीतून त्यांनी मीरा भाईंदर मध्ये डीप क्लीन ड्राइव्ह सोबत डेव्हलपमेंटची ड्राइव्ह सुरू केली. त्यांनी येथील अनेक विकासकामे पूर्ण केली असून, त्यामुळे या शहरात अनेक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यांनी उभारलेले नाट्यगृह, कॅशलेस रुग्णालय, विविध समाज भवन यापेक्षा आज त्यांनी उभारलेले हे कला दालन सर्वोत्तम असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने एसटी मध्ये अनेक सुधारणा होत आहेत. नवनवीन गोष्टींचा अवलंब करून एसटी फायद्यात आणण्याचे प्रयत्न ते करत आहेत. या शहरामध्ये आता मेट्रो सुरू झाली आहे. महिन्याभरात पॉड टॅक्सीचे भूमिपूजन होत आहे. त्यामुळे आगामी काळात जे काही नवीन असेल ते या मीरा भाईंदर शहरामध्ये नक्की उभारलेले आपल्याला दिसेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा, माजी नगरसेविका सौ.परिषा सरनाईक, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक, राजू भोईर, विक्रम प्रताप सिंह, सचिन मांजरेकर, पूजा आमगावकर, निशा नार्वेकर, रिया म्हात्रे तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि मीरा भाईंदर विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

