“हे शहर पैशाने विकले जाणार नाही !” – पारकरांचा भाजपावर निशाणा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून आरोप-प्रत्यारोपांना ऊत आला आहे. शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश परकर यांनी भाजपच्या उमेदवारावर थेट गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. मतदारांना प्रलोभन म्हणून मोठ्या प्रमाणात रोकड वाटप केले जात असल्याचा ठोस आरोप परकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
पारकर म्हणाले की, “विकासाच्या नावाखाली निवडणूक लढवणारे आज जनतेचेच पैसे पुन्हा मतदारांना वाटत आहेत. शहरातील प्रत्येक मतदाराला दहा ते पंधरा हजार रुपये देण्याइतपत परिस्थिती का निर्माण झाली? लोकांना पैसे देऊन मतदानाचे अधिकार विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीवरील आघात आहे.” पराभव निश्चित दिसू लागल्यानेच विरोधकांनी पैशांची उधळण सुरू केल्याचे परकर यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “हे शहर पैशाने विकले जाणार नाही, याची खात्री मला सिंधुदुर्गकरांवर आहे. मतदारांना खरे-खोटे पटते. पैशाचा ढोंग करून लोकांचे मन वळवता येत नाही. मतदार आता जागरूक झाले आहेत आणि पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा कोणाचाही डाव सफल होणार नाही.”
पारकर यांनी शहर विकास आघाडीबाबतही स्पष्टीकरण देताना सांगितले की, “आमची आघाडी कोणत्याही एका पक्षाच्या चिन्हावर आधारित नाही. शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याची भावना आणि सर्व भ्रष्ट व जातीवादावर आधारित राजकारणाला आव्हान देण्याच्या हेतूने ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे.” या आघाडीला नारळाचे चिन्ह मिळाले असून कोणताही उमेदवार अधिकृत पक्षचिन्हावर उभा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पारकर यांच्या या आरोपांमुळे निवडणुकीतील वातावरण अधिकच तापण्याची शक्यता असून आता भाजपकडून कोणती प्रतिक्रिया मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


