गणेश पालकर क्रिकेट क्लबला विजेतेपद
विजय बने
मुंबई, २२ मे : दिलीप वेंगसरकर फाउंडेशनच्या वतीने ओव्हल मैदान, चर्चगेट येथे आयोजित करण्यात आलेल्या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत गणेश पालकर क्रिकेट क्लब संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी प्रतीक क्रिकेट अकादमी संघावर सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळविला. विजेत्यांना मुंबईच्या वरिष्ठ निवड समितीचे चेअरमन संजय पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी बोलताना संजय पाटील यांनी सुरुवातीला मुलांना बोलते करून त्यांनी या वर्षी विविध स्पर्धेत केलेल्या चांगल्या कामगिरीची माहिती करून घेत त्यांचे कौतुक केले. जे खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करीत राहतील त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी निवड समिती घेईल असे सांगत मुलांना आश्वस्त केले. त्याचवेळी मुलांच्या पालकांनीही आपल्या मुलांवर अन्याय झाला अशा प्रकारचे वक्तव्य करून मुलांना नाउमेद न करता त्यांना आणखीन चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. मुंबईचा खेळाडू म्हणजे त्याच्या खडूसपनासाठी ओळखला जातो, त्यामुळे प्रत्येकाने जिद्दीने खेळ करून एवढी चांगली कामगिरी करा कि निवड समितीला तुमच्या नावाची दखल घ्यावीच लागेल असेही त्यांनी सांगितले. दिलीप वेंगसरकरांसारख्या महान खेळाडूंचे मार्गदर्शन तुम्हाला लाभते आहे हे तुमचे भाग्य असून त्यांच्यामुळेच तुम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो आहे. ज्या क्लबने तुम्हाला संधी दिली त्या क्लबशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहण्याचा सल्लाही त्यांनी मुलांना दिला.https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-राजस्थानमध्ये-js/
दिलीप वेंगसरकर फाउंडेशन आयोजित १२ वर्षाखालील मुलांच्या ड्रीम ११ कप किकेत स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या गणेश पालकर क्रिकेट क्लब संघाचे छायाचित्र. सबत मुंबईच्या वरिष्ठ क्रिकेट निवड समितीचे चेअरमन संजय पाटील आणि अकादमीचे प्रशिक्षक सुरेंद्र माने दिसत आहेत.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा प्रतीक क्रिकेट अकादमीचा निर्णय त्यांच्या अंगलट आला आणि केवळ २०.१ षटकांतच ८३ धावांत त्यांचा डाव गुंडाळला गेला. आदित शिंदे (१६ धावांत ३ बळी) आणि शौर्य भानुशाली (७ धावांत २ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीने ही करामत केली. आयूष वाढे (१६) आणि ओंकार राशीकर (२७) यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी पार निराशा केली. या आव्हानाचा पाठलाग करताना विराज (१६) आई आरिश खान (३०) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३१ धावांची तर आरिशने आरव दीक्षित च्या (नाबाद २७) साथीने तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागी रचत गणेश पालकर क्रिकेट क्लबचा विजय निश्चित केला. त्यांनी १५.२ षटकांतच ३ बाद ८४ धावा करून विजतेपद पटकावले.
संक्षिप्त धावफलक : प्रतीक क्रिकेट अकादमी – २०.१ षटकांत सर्वबाद ८३ (आयूष वाढे १६, ओंकार राशीकर २७; आदित शिंदे १६ धावांत ३ बळी, शौर्य भानुशाली ७ धावांत २ बळी) पराभूत वि. गणेश पालकर क्रिकट क्लब – १५.२ षटकांत ३ बाद ८४ (विराज १६, आरिश खान ३०, आरव दीक्षित नाबाद २७).