अहमदाबादमध्ये 26 जुलै 2008 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींना शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात आली.या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अहमदाबाद सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए आर पटेल यांनी अखेर हे प्रकरण निकाली काढले. या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना एक लाख, गंभीर जखमींना 50 हजार आणि किरकोळ जखमींना 25 हजार रुपये देण्यात येतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने 49 दोषींपैकी 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर उर्वरीत 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अहमदाबादमध्ये २००८ ला 70 मिनिटांच्या कालावधीत एकूण 21 बॉम्बस्फोटांनी हादरून गेले होते.बॉम्बस्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला, तर 200 लोक जखमी झाले होते. बॉम्बस्फोटांच्या तपासानंतर सुमारे 80 आरोपींवर खटला चालवण्यात आला. पोलिसांनी अहमदाबादमध्ये 20 एफआयआर नोंदवले होते, तर सुरतमध्ये आणखी 15 एफआयआर नोंदवण्यात आले होते.