गोवा: गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला 20 जागा मिळाल्या आणि इतर 2 आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. असे असले तरी निवडणुकीच्या दहा दिवसानंतरही पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे गोव्याचे नवे मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब झाले नव्हते. याला कारण विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत पेच निर्माण केला होता.
या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सावंत आणि राणे यांना दिल्लीला बोलावून घेतले. नंतर आज अखेर मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.महत्वाचे म्हणजे विश्वजीत राणे यांनीच बैठक बोलावून प्रमोद सावंत यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले.प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.
पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या प्रमोद सावंत यांना माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या नंतर गोव्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले होते.डॉ. प्रमोद सावंत पर्रिकर सरकारच्या काळात विधानसभेचे अध्यक्ष पदही सांभाळले होते.


