प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी: महानिर्मिती कंपनी मधील कर्मचारी संघटनांनी दि. 28 व 29 मार्च 2022 रोजी संप पुकारला आहे. कंपनीकडील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे संप कालावधीमध्ये कोळकेवाडी धरण पायथा विद्युतगृह (कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा 3) बंद राहील्यास धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाची वक्रद्वारे उघडण्याची व्यवस्था करणेबाबत महानिर्मिती कंपनी मार्फत सूचित केले आहे.
उपरोक्त परिस्थितीत कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा 1, 2 व 4 मधून कोळकेवाडी धरणामध्ये पाणी चालू राहिल्यास धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोळकेवाडी धरणामधून बोलादवाडी नाल्यामध्ये पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलादवाडी नाल्यामधील पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
सबब, बोलादवाडी नाल्यालगतच्या कोळकेवाडी, नागावे, अलोरे तसेच वशिष्टी नदीपात्रालगतच्या खडपोली, पिंपळी व चिंचघरी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. दरम्यान, दळवटणे गावापुढे वशिष्टी नदीपात्रामध्ये नेहमीप्रमाणे विसर्ग चालू राहील.


