सिंधुदुर्ग : वडाचापाट ग्रामपंचायत कार्यालय नूतन इमारतीचे खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

0
125

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

मालवण तालुक्यातील वडाचापाट ग्रामपंचायत कार्यालय नूतन इमारत लोकार्पण सोहळा शुक्रवारी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला.

दरम्यान, यापूर्वी गावातील सत्ताकेंद्र ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी स्वतःला कॉन्ट्रॅक्ट मिळाली पाहिजेत हाच हेतू ठेवला. झालेली कामेही दर्जाहीन होती. मात्र गावातील जनतेने सत्ताबदल केला. त्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात विकासनिधी आला. अनेक विकासकामे झाली, होत आहेत. गावाला हक्काच्या जागेत ग्रामपंचायत इमारत हवी होती ते गावचे स्वप्न तुषार भालचंद्र पाटकर यांच्या दातृत्वातून मिळालेल्या जागेत साकार होत झाले आहे. यासाठी सरपंच नमिता कासले यांची ठाम भूमिका व उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर यांनी मोठ्या संघर्षातून केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला. सदस्य व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. आज ग्रामपंचायत वास्तू उभी आहे. या ग्रामपंचायत इमारतीत अधिक सोयीसुविधा ग्रामस्थांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर यांनी मागणी केल्यानुसार १० लाख निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली. याठिकाणी आरोग्य उपकेंद्र उभारणीसाठीही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तर खासदार विनायक राऊत यांनीही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिप अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, संदेश पारकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सरपंच सौ. नमिता कासले, उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर, उपसचिव विधी विभाग विधानभवन सायली कांबळी, सुभाष पालव मंत्रालय अधिकारी, ग्रामपंचायत उभारणीसाठी वडिलांच्या इच्छेनुसार मोफत जागा देणारे जमीन मालक तुषार भालचंद्र पाटकर, बाळ महभोज, युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, मंदार केणी, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, अमित भोगले, अवधुत मालणकर, नाना नेरुरकर, विजय पालव, भाऊ चव्हाण, नार्वेकर, यासह सदस्य अनंत पाटकर, विद्याधर पाटकर, सुगंधी बांदकर, ग्रामसेवक सौ. माधुरी कामतेकर यासह अन्य उपस्थित होते.

इमारतीचे फीत कापून उदघाटन करताना व्यासपीठावर शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभरंभ झाला. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी इशस्तवन व स्वागतगीत सादर केले. उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

आपल्या प्रास्ताविक भाषणात उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर यांनी विरोधकांचा समाचार घेत रोखठोक भूमिका मांडली.

स्वमालकीच्या जागेत ग्रामपंचायत इमारत असावी हे वडाचापाट ग्रामस्थांनी पाहिलेले स्वप्न ५६ वर्षानी पूर्ण झाले. मात्र ही इमारत बांधताना जो संघर्ष करावा लागला तो खूप मोठा आहे. मात्र आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, जिप सदस्य संजय पडते, अन्य शिवसेना जिप सदस्य तसेच पालकमंत्री उदय सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. भालचंद्र पाटकर यांचे सुपुत्र तुषार पाटकर कुटुंबीयांनी जागा देऊन केलेले दातृत्व लाखमोलाचे आहे. भविष्यात याठिकाणी आरोग्य उपकेंद्र व्हावे हे पाटकर कुटुंबीय यांचे स्वप्न पूर्ण केले जाईल. गावात लाखोंचा विकासानिधी आमदार खासदार यांच्या माध्यमातून गावात येत आहे. यापुढेही गावच्या गतिमान विकासासाठी कटिबद्ध असल्याचे उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर यांनी सांगितले.

विघ्नसंतोषी माणसे…

हा कार्यक्रम होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न काही विघ्नसंतोषी माणसांकडून करण्यात आला. काही मिटिंगही गावात घेण्यात आल्या. मात्र विरोधाच्या राजकारणाला ग्रामस्थांनी धुडकवले. ग्रामस्थांच्या सहकार्याने व आई शांतादुर्गा यांच्या कृपेने हा कार्यक्रम आज संपन्न होत आहे. राजकारण असावे मात्र त्याला मर्यादा असावी. असो आज सोनियाचा दिन आहे विरोधकाना त्यांचा विरोध लक्षलाभ होवो असा जोरदार टोला श्रीकृष्ण पाटकर यांनी विरोधकांना लगावला.
यावेळी जागा मालक तुषार पाटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यासह ग्रामस्थांनी विचार मांडले. उपस्थित ग्रामस्थांच्या मोठ्या उत्साहात ग्रामपंचायत इमारत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here