सिंधुदुर्ग: मान्सून काळात आपत्तीजन्य परिस्थितीत मुकाबला करण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा सज्ज

0
187

ओरोस: येणाऱ्या मान्सून काळात आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली तर या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणाने सज्ज रहावे. यासाठी सर्व विभागाने आपत्ती निवारणाचे नियोजन आराखडे तयार करुन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास सादर करावे. त्याचबरोबर तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाबाबतच्या बैठकांचे आयोजन करुन योग्य ते नियोजन करावे. असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण तथा निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिले.

जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात कर्ली नदीमुळे कुडाळ पावशी, बाव, चेंदवण, सरंबळ. वेंगुर्ला तालुक्यात कालवी नदीमुळे केळूस कालवी, होडावडा तळवडा नदीमुळे होडावडा, परबवाडी, सुभाषवाडी. कर्ली खाडीमुळे चिपी कर्ली. मालवण तालुका- गड नदी (कालावल खाडी) मुळे मसुरे, मर्डे, बांदिवडे बुद्रुक, चिंदर, अपराजवाडी, तर गड नदीमुळे माळगाव व बागायत. सावंतवाडी तालुक्यात – तेरेखोल खाडीमुळे इन्सुली, बांदा, शेर्ले, तळवडे, आरोंदा, किनळे, कवठणी, सातार्डा, सातोसे. देवगड तालुक्यात- विजयदूर्ग खाडीमुळे – मणचे, मालपेवाडी, मुस्लिमवाडी, धालवल मुस्लिमवाडी, कोर्ले. कणकवली तालुक्यात – सुखनदीमुळे- खारेपाटण बाजारपेठ, बंदरगाव. गडनदीमुळे- कलमठ वरवडे, फणसनगर. जानवली नदीमुळे- जानवली, वरवडे, फणसनगर ही जिल्ह्यातील पूरबाधित गावे आहेत.

या ठिकाणी आवश्यक ती सर्व उपाय योजना करण्यासाठी आतापासूनच सुरुवात करावीत. जिल्ह्यामध्ये शोध व बचाव कार्यासाठी लाईफ जाकेट्स- ४००, लाईफ बोया-२५०, बोट्स-२१, एलईडी लायटिंग टोवर्स-४१, वूड कटर-११, स्कुबा सेट्स-२ असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये कोणत्याही गावात आपत्तीजन्य घटना घडल्यास ०२३६२- २२८८४७ किंवा १०७७ या आपत्ती निवारण कक्षाच्या संपर्क क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधावा. असे आवाहनही दत्तात्रय भडकवाड यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह (जुने) येथे मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसिलदार, तालुका गटविकास अधिकारी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड पुढे म्हणाले, आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सर्वंच यंत्रणांनी आराखडे तयार करताना प्रत्येक बाबींचा विचारात घेऊन त्याप्रमाणे नियोजन असावे. संभाव्य पूर परिस्थिती उद्भवल्यास हानी होवू नये. याबाबत प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याने आराखड्यांचे नियोजन करावे. संभाव्य पूर परिस्थितीत जलसंपदा विभागाने पाणी विसर्गाचे योग्य नियोजन करावे. पावसाळ्याच्या काळात घाट रस्ते दरड कोसळून बंद होऊ नये यासाठी बांधकाम विभागाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी. त्याचबरोबर मानवी वस्तीच्या ठिकाणी दरड कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता अशी गावे निश्चित करुन याठिकाणी करावयाचा उपाययोजनाचा प्रस्ताव तयार करुन प्रशासनास सादर करावा.

जिल्ह्यामध्ये विजेचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी महावितरणने सर्व वीज पूरवठा यंत्रणेची तपासणी करावी व आवश्यक त्या ठिकाणाची कामे तातडीने पूर्ण करावी. पूर काळात बोटींची अत्यंत महत्वाची भूमिका असून त्या सुस्थितीत आहेत किंवा कश्या याबाबत तपासणी करुन बोटींची दूरस्ती करुन ठेवावी. असे सांगून श्री. भडकवाड पुढे म्हणाले, मान्सून काळात पूर परिस्थिती उद्भल्यास सर्वंची यंत्रणांनी आपआपल्या संपर्क यंत्रणा अद्ययावत कराव्यात व समन्वयाने कामकाज पार पाडण्यासाठी आवश्यक बाबी यांचे नियोजन करावे. त्याचबरोबर एनडीआरएफ च्या पथकाच्या संपर्कात राहून उद्भवलेली परिस्थिती सावरण्यासाठी तात्काळ पाचारण करता यावे तसेच एनडीआरएफ ची पथके ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी पोहचवता यावी यासाठी आतापासूनच तालुका स्तरावरुन नियोजन करावेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दहा वर्षामध्ये ३५७३.१४ मी .मी. इतके सरासरी पर्जन्यमान झाले आहे. सन २०१५ मध्ये २१८०.६१ मी.मी. इतके सर्वात कमी पाऊस झाला तर २०२० मध्ये ४९९०.४० मि.मी इतका सर्वाधिक पाऊस झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here