जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळांमधील ९८३ शिक्षकांना प्रशासनाने सहभागी करून घेतले आहे. हे शिक्षक रेल्वे स्थानक, बस स्थानक, कोविड लसीकरण व कोविड चाचणी केंद्रांवर कार्यरत राहणार आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत आरोग्य कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या प्राथमिक शिक्षकांवर, प्रत्येक घरी जाऊन कोरोनाबाबत, मास्कबाबत जनजागृती करणे, ही जबाबदारी होती. एवढेच नाही, तर गावा-गावातील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध ते घेत होते. आता पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शिक्षकांना कामगिरी सोपविण्यात आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या ९८३ प्राथमिक शिक्षकांच्या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कंट्रोल रूममध्ये ७८ शिक्षक, ग्राम कृती दलासाठी ११७ शिक्षक, चेक पोस्टवर ३४९ शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रात ३०८ शिक्षक, तालुका मुख्यालयात ५२ शिक्षक आणि रेल्वे स्थानकावर ८१ शिक्षक कामगिरी बजावत आहेत. जिल्हा परिषदेकडून कोरोनाच्या काळामध्ये काम करण्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आलेले सर्व शिक्षक चोखपणे आपली कामगिरी बजावत आहेत. शिक्षकांच्या कामगिरीने कोरोनाला रोखण्यास प्रशासनाला मोठा हातभार लागत असल्याचे दिसत आहे.