मुंबई विद्यापीठ आयोजित ‘अविष्कार ‘ स्पर्धेत सिंधुदुर्ग येथील विद्यार्थींनी सृष्टी तावडे हीने मानवता, भाषा आणि ललित या विभागातून पाचवा क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती आणि नवनिर्माण क्षमता विकसित व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. सृष्टी तावडेच्या या यशामुळे चरित्रकार डॉ. पद्मभूषण धनंजय कीर, रत्नागिरी उपपरिसराचे नाव विद्यापीठ स्तरावर उंचावले आहे.
या स्पर्धेत ती मुंबई विद्यापीठात पाचवी आली. रत्नागिरी उपपरिसरातून अखेरच्या यशापर्यंत पोहचेलेली या अविष्कार स्पर्धेतील ती पहिलीच विद्यार्थिनी ठरलेली आहे. तिचा संशोधनाचा ‘दक्षिण कोकण विभागातील प्लास्टिक वापराने निर्माण झालेल्या पर्यावरणीय समस्यांचे शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून निवारण’ हा विषय होता. सृष्टी तावडे हिच्या या यशाबद्दल तिचे व तिला मार्गदर्शन करणाऱ्या तिच्या मेंटर प्रा. पूनम गायकवाड यांचे रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर, सिंधुदुर्ग उपपरिसराचे प्रभारी संचालक श्रीपाद वेलींग, सहाय्यक कुलसचिव अभिनंदन बोरगावे, डॉ. पांडुरंग पाटील, डॉ. सतिश मांजरे, प्रा, अमर निर्मळे, प्रा. तौफिन पठाण, प्रा. माया रहाटे, प्रा. विजय गुरव, प्रा. सोनाली मेस्त्री आदींनी अभिनंदन केले. सृष्टी तावडे हीचे यश आमच्यासाठी अभिमानास्पद असून विद्यार्थ्यांनी तिच्या या प्रेरणादायी यशातून ऊर्जा घ्यावी, अशी भावना श्रीपाद वेलींग यांनी व्यक्त केली आहे.
समाजकार्य विभागाच्या प्रा. पूनम गायकवाड या तिच्या मेंटर होत्या. या यशाबद्दल सर्व स्तरातून सृष्टी तावडेसह प्रा. पूनम गायकवाड यांचे कौतुक अन अभिनंदन होत आहे. याबाबतचे वृत्त असे, संशोधनवृत्तीला चालना मिळावी त्याचबरोबर नवनिर्माणाचे स्वप्न विद्यार्थ्यांच्यात प्रेरण्याबरोबरच त्यांच्यातील क्षमता विकसित व्हावी याकरिता मुंबई विद्यापीठ दरवर्षी ‘अविष्कार’ स्पर्धेचे आयोजन करते. यामध्ये विविध क्षेत्रांच्या विषयावरील अभ्यास, संशोधन करून आपले सादरीकरण सादर करावयाचे असतात. या आंतर विद्यापीठीय स्पर्धेत अनेक अभ्यासू, संशोधक विद्यार्थी सहभागी होतात.
रत्नागिरी उपपरिसर पद्व्युत्तर विभागातून एकूण १२ विद्यार्थ्यांनी विविध विषय प्रकल्पांसह स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यामधील चार विद्यार्थी अंतिम फेरीपर्यंत पोहचले. संशोधनपर असलेले प्रोजेक्ट विषय तसेच त्याचे सादरीकरण या आणि अशा अनेकविध संदर्भाने त्यातील संशोधन मूल्याच्या निकषातून स्पर्धेत अंतिम टप्यापर्यंत जाता येते. सृष्टी तावडे या विद्यार्थीनीच्या संशोधन प्रोजेक्टने अंतिम फेरीत मुसंडी मारत घवघवीत यश संपादन केले.


