झारखंड-बिहारसह शुक्रवारी आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या २० ठिकाणांवर संचालनालयाने छापे टाकले. आयएएस अधिकारी पूजा सिंघल खाण सचिव आहेत. या छाप्यात पूजा सिंघल यांच्याकडे २५ कोटी रुपयांची रोकड सापडली.ईडी मनरेगा घोटाळ्यासह त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करत आहे.
ईडीने पूजा यांचे सासरे कामेश्वर झा यांचे मुजफ्फरपूरचे घर, दिल्लीत आई-वडिलांचे घर तसेच कोलकाता, मुंबई, जयपूर, गुरुग्राम आणि फरिदाबादमध्येही छापे टाकले. मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले, आम्ही कारवाईला भीत नाही. देशात कायदा आहे. घटना आहे. त्याच्याबाहेर कोणीही जाऊ शकत नाही.
पूजा सिंघल फक्त २१ वर्षीच पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाल्या होत्या. त्या सर्वच मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या राहिल्या.२०१३ मध्ये पलामूमध्ये पूजा उपायुक्त असताना खासगी कंपनीला कठौतिया खाण पट्टा वाटप केला. यावरूनही वाद झाला. त्याची अद्यापही चौकशी सुरू आहे. त्या चतरामध्ये मनरेगा योजनेत दोन एनजीओंना ६ कोटी रु. देण्यावरूनही चर्चेत आल्या आहेत


