प्रतिनिधी- पांडुशेठ साठम
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा शिवसंपर्क अभियान प्रमुख, शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ आज कणकवलीत करण्यात आला. यावेळी कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित केलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या मेळाव्यात ते बोलत होते.या मेळाव्याला शिवसैनिकांची खचाखच गर्दी होती.
शिवसेना ही समाजकारणाला प्राधान्य देणारी संघटना आहे.शिवसेनेचा व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंचा विचार घराघरात पोहोचवून शिवसेना आणखी मजबूत करा.आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व देशाला आणि महाराष्ट्राला दिशा देणारे आहे. त्यामुळे टीकाकारांना आपल्या कामातून उत्तर देत आहोत. शिवसेना काल होती आज आहे आणि उद्याही अधिक मजबूतीने असणार आहे. ज्यांनी शिवसेना सोडली त्यांनी स्वतःचे उद्या काय होईल याची काळजी करा, शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या कुटुंबाचा घटक असून शिवसेना आणि शिवसेनेचे शिलेदार समृद्ध आहेत. कोणत्याही प्रसंगात शिवसेना कधीही डगमगली नाही. शिवसैनिकांनी कोविड काळात जीवाची बाजी लाऊन जनतेला सेवा दिली. निराधार कुटुंबांना आधार दिला.शिवसेनेने कधी जात पात धर्म बघितला नाही. मानवता हाच धर्म शिवसेना मानत आली आहे.कोरोनाच्या कठीण काळात राज्याची अर्थव्यवस्था टिकवून ठेवणारे कणखर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे राज्याला लाभले आहेत. जनतेला त्यांनी आधार दिला.कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा त्यांनी महाराष्ट्रभर पुरविल्या त्यामुळेच महाराष्ट्राने कोरोनावर मात केली.मात्र विरोधक महाराष्ट्राला कमी लेखत आहेत.महाराष्ट्राची बदनामी करत आहेत त्यांना आपली जनता कधीच माफ करणार नाही.असे प्रतिपादन शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी केले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक प्रदीप बोरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष संदेश पारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा नियोजन सदस्य अतुल रावराणे, स्वप्नील टेंबवलकर, दिनेश बोभाटे,प्रवीण महाले,नाना तिडके, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख राजु शेटये,नंदू शिंदे, विलास साळसकर, कणकवली तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, डॉ.प्रथमेश सावंत, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके,देवगड तालुकाप्रमुख मिलींद साटम, सचिन सावंत,बाळा भिसे, शेखर राणे, निसार शेख, ललित घाडीगावकर,निनाद देशपांडे, अमेय जठार, अतुल सरवटे, आदित्य सापळे आदी उपस्थित होते.
कणकवली मतदारसंघात पुढील आमदार शिवसेनेचाच-आ.वैभव नाईक
आपली लढाई जगातील मोठा नोंदणीकृत पक्ष असलेल्या भाजपशी आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून ठाकरे सरकारने केलेली कामे गावागावात जाऊन लोकांपर्यंत पोचवली पाहिजेत. कणकवली विधानसभा मतदारसंघात वेगाने परिवर्तन होत आहे. सोसायटी निवडणुकीत सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. त्यामुळे कणकवली विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेचा विजय नक्की आहे. खासदार व केंद्रीयमंत्री झाल्यानंतर नारायण राणे यांनी जिल्ह्यात एक रुपयाचा निधी दिल्याचे जाहीर करावे असे आव्हान देतो. केवळ शिवसेनेवर टीका करण्याचे काम राणे कुटुंबीय करतात, अशी टीका आ. वैभव नाईक यांनी केली.
तुम्ही लोकांची कामे करा-अरुण दूधवडकर
गावागावात गटप्रमुख, प्रभागनिहाय शाखाप्रमुख नेमणूका झाल्याच पाहिजेत. आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद सत्ता आणायची असेल तर ही फळी निर्माण करणे अत्यावश्यक आहे. जी केवळ २० टक्के नेमणूका अपूर्ण आहेत त्या पूर्ण करा. आळस झटका कामाला लागा. स्थानिक विरोधी उमेदवार राणे काय बडबडतात ते बडबडु द्या. तुम्ही लोकांची कामे करा असे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शिवसैनिकांना आवाहन केले.
जिल्हा परिषद निवडणुकीत भगवा फडकणार-सतीश सावंत
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राणे कुटुंबीय मर्यादित राहिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत घोटाळ्यांची मालिका सुरू आहे.स्टंटबाजी करणे, प्राणघातक हल्ले करणे हे कणकवलीच्या आमदारांचे काम आहे येत्या काळात हि दहशत मोडीत काढायची आहे. आजच्या शिवसंपर्क मेळाव्याला जेवढी गर्दी हॉलमध्ये आहे तेवढेच शिवसैनिक बाहेर उभे आहेत. यावरून येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचा विश्वास सतीश सावंत यांनी व्यक्त केला.
पदाला न्याय देण्यासाठी मेहनत घेणार.-संदेश पारकर
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यसरकारचे चांगले काम सुरु आहे. ठाकरे सरकारच्या माध्यमातून झालेली विकास कामे जनतेपर्यत पोहचविली पाहिजेत. बाळासाहेबांनी अनेक नेते घडविले सामान्य नागरिकांना शाखाप्रमुख ते नगरसेवक, आमदार ,खासदार,मुख्यमंत्री बनविले. बाळासाहेबांचे विचार आपण पुढे नेले पाहिजेत. खा. विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आ. वैभव नाईक आ. दीपक केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी झटत आहेत. कोकण पर्यटन विकास समितीची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. या पदाला न्याय देण्यासाठी मेहनत घेणार. आ. वैभव नाईक यांनी जी. प. वर प्रशासकीय राजवट असून देखील अधिकाऱ्यांच्या साथीने कृषी प्रदर्शन, मालवण पर्यटन महोत्सव यशस्वी केलेत.याची आठवण करून देत संदेश पारकर यांनी आ. वैभव नाईक यांचे कौतुक केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे हात बळकट करूया-अतुल रावराणे
कोकणावर शिवसेनेचे प्रेम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वाधिक फायदा उद्धवजी ठाकरे यांनी कोकणला करून दिला. कोस्टल रोड मंजूर करून दिला आहे. शासकीय मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गात सुरू केले आहे.कोविड टेस्ट लॅब दिली. कोकणला शिवसेनेने भरभरून दिले आहे. आता आपली देण्याची वेळ आहे. आगामी सर्व निवडणुकीत सेनेचा भगवा फडकवूया आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे हात बळकट करूया, असे आवाहन अतुल रावराणे यांनी केले.
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा समन्वयक प्रदीप बोरकर, व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनीही शिवसंपर्क अभियानाची माहिती देत. अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. शिवसेनेच्या वतीने आंबा फळांचा हार घालून खा. अनिल देसाई यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मान्यवरांचा सत्कार व नूतन सोसायटी चेअरमन,व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.