सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याला केंद्र सरकारचा उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार दुसऱ्यांदा जाहीर ! जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
186
सिंधुदुर्ग जिल्ह्याला केंद्र सरकारचा उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार दुसऱ्यांदा जाहीर ! जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

ओरोस: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा कौशल्य विकास कृती आराखड्यास केंद्र सरकारचा दुसरा उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण 9 जून रोजी नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटर येथे केंद्रीय शिक्षा, कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त शालिक पवार यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

देशभरातील 336 जिल्ह्यामधून प्राथमिक स्तरावर 30 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश झाला होता. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग मार्फत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याची भौगोलिक स्थिती, परंपरागत व्यवसाय, नैसर्गिक संसाधने, साधनसामग्री व मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करुन जिल्ह्याचा वार्षिक कृती आराखडा तयार करणयात आला.

कोरोना काळात आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळाचा अभाव दूर करण्यासाठी विभागाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, कस्टमाईज क्रॅश कोर्स प्रोग्राम कोविड वॉरियर्स, संकल्प या योजनांमधून 830 उमेदवारांना जनरल ड्युटी असिस्टंट बेसिक, ॲडव्हान्स, इमरजन्सी मेडिकल टेक्निशियन, ॲडव्हान्स कोविड केअर सपोर्ट, पीएसए ऑक्सिजन प्लांट मेन्टनन्स या कोर्सेसचे प्रशिक्षण दिले. कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी विविध क्षेत्रात प्रशिक्षण देणाऱ्या दर्जेदार प्रशिक्षण संस्थांची स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणी करण्यात आली. या प्रशिक्षण संस्था वैभववाडी, कणकवली, माणगाव, शिरोडा, सावंतवाडी, मालवण येथे वेगवेगळ्या क्षेत्रात प्रशिक्षण देत आहेत. केंद्र सरकारचा दुसरा उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार जाहिर झाल्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here