पुणे: कोरोनाच्या ओमायक्रॅान व्हेरिएटचा नवीन विषाणू बीए.4 आणि बीए.5 ने महाराष्ट्रात सापडला आहे. या व्हेरिएंटचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. पुणे शहरामध्ये या व्हेरिएंटचे सात रुग्ण सापडल्याने चिंता वाढली असून दक्षता घेण्यात येत आहे.
पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाने सुरू असणाऱ्या जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने शनिवारी जारी केलेल्या आपल्या दैनंदिन अहवालातून याबाबत माहिती दिली आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने केलेल्या जनुकीय तपासणीत ओमिक्रॉनचे हे नवीन व्हेरिएंट आढळले असून याला फरिदाबाद येथील इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर या संस्थेने दुजोरा दिला आहे.
हे सर्व रुग्ण पुणे शहरातील आहेत. हे रुग्ण 4 मे ते 18 मे 2022 या कालावधीतील आहेत. या रुग्णांमध्ये चार पुरुष, तर तीन महिलांचा समावेश आहे. चार रुग्ण 50 वर्षांवरील तर दोन रुग्ण हे 20 ते 40 वर्षे वयोगटातील आहेत. तर एक रुग्ण 9 वर्षांचा आहे. या रुग्णांपैकी दोघांचा दक्षिण आफ्रिका आणि बेल्जियम प्रवास झाला आहे. तिघांनी केरळ आणि कर्नाटक येथे प्रवास केला आहे.
सर्व नागरिकांनी मास्कचा वापर,वारंवार हात धुणे आणि सोसिअल दिसतेनसिंग पाळणे आवश्यक असून गरज पडल्यास निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे.


