प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
भर उन्हाळ्यात दाभोली ग्रामस्थांना वारंवार विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.गावाचे वायरमन श्री. दळवी दि. १८ एप्रिलपासून रजेवर गेले आहेत.त्यानंतर येथे कोणीही वायरमन उपलब्ध नाही.विजेच्या समस्येमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत त्यामुळे त्यांनी विद्युत मंडळाला या समस्येवर ताबडतोब उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आता पावसाळाही तोंडावर आला आहे. दाभोली,वायंगणी, खानोली गावातील वायरिंगवरील झाडांच्या फांद्या तशाच आहेत.पावसाळ्यात फांद्या वायरींवर पडून विजेचा खोळंबा होणारच आहे पण काही धोका झाल्यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न ग्रामस्थांनी वितरणाला विचारला आहे.दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. वायंगणी गावचे श्री.धोंड वायरमन यांनाही ग्रामस्थांनी विजेच्या समस्या निवारणाबाबत विनंती केली होती. परंतु त्यांनीही कामाचा लोड जास्त असल्याचे सांगत नकार दिला असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात लिहिले आहे.
गावातील लाईटचे काही खांबही गांजले असून पावसाळ्यात वादळी वाऱ्याने ते तुटून पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे.सदर तिन्ही गावांना वेतोरे मार्गे एकाच लाइनवरून वीजपुरवठा करण्यात आला आहे.जर या लाईन मध्ये काही अडथळा निर्माण झाला तर वेंगुर्ला लाइनवरून वीजपुरवठा केला जातो. परंतु लाईनमन नसल्यामुळे या लाइनवरूनही वीजपुरवठा करता येत नाही अशा सर्व तक्रारी आठ दिवसात निवारण न झाल्यास ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.


