सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाच्या सदस्या श्रीमती. सुप्रदा प्रकाश फातर्पेकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट

0
119

ओरोस: महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाच्या सदस्या श्रीमती. सुप्रदा प्रकाश फातर्पेकर या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आज आल्या होत्या.जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय व पोलीस अधिक्षक कार्यालय येथे भेट देऊन महिला योजना व प्रकरणांचा आढावा घेतला. जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयामध्ये महिलांच्या समस्यांबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक व त्यांच्या टीमशी श्रीमती फातर्पेकर यांनी चर्चा केली. त्यावेळी जिल्हा रुग्णालय येथे 24 तास किमान एक अधिकारी तैनात ठेवावा अशी सूचना राज्य महिला आयोगाच्या सदस्या सुप्रदा फातर्पेकर यांनी केली.

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, सावंतवाडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सोळंखी, गृह विभागाच्या पोलीस उपअधिक्षक डॉ. कविता गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना शिरतावडे, महिला अत्याचार निवारण कक्षाच्या सहा. पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे यांच्यासह युवासेना सचिव दुर्गा भोसले, युवासेनेच्या रुची राऊत, जिल्हा महिला आघाडीच्या जान्हवी सावंत तसेच नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते. सखी वन स्टॉप सेंटरला पोलीसांच्या मदतीची गरज असेल तेंव्हा तातडीने पोलीस मदत उपलब्ध व्हावी अशी सूचना देऊन श्रीमती फातर्पेकर म्हणाल्या, कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वन स्टॉप सेंटरच्या अधिकाऱ्यांना पोलिसांची मदत हवी असते. अशा वेळी घटना आमच्या पोलीस स्थानकाच्या क्षेत्रातील नाही म्हणून पोलीस मदत दुसऱ्या पोलीस ठाण्याकडून घेण्याविषयी सांगितले जाते. असे न होता. जे पोलीस ठाणे जवळ असेल तेथून मदत उपलब्ध व्हावी. गुन्ह्यांमधील वैद्यकीय तपासणीसाठी वेळ लागतो. त्यासाठी वैद्यकीय तपासणी लवकरात लवकर कशी करता येईल हे पहावे. बस डेपोच्या ठिकाणी पहाटेच्या वेळी पोलिसांची गस्त घालावी. बालकांबाबतच्या गुन्ह्यांबाबत जागृती करावी.

सिंधुदुर्ग पोलीस विभाग चांगले काम करत आहे. गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाणही चांगले आहे. महिलांबाबच्या गुन्ह्यांचे प्रमाण सिंधुदुर्गमध्ये कमी आहे, ही चांगली बाब असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी श्रीमती फातर्पेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांबाबत सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे सुरू असलेला कक्षाचे तसेच रेल्वे स्थानकावर पहाटे तसेच रात्रीच्या वेळी येणाऱ्या एकट्या महिलांना मदत पुरवण्याचे काम याचे कौतुक केले. तसेच जिल्ह्यातील गुन्ह्यांची व त्यांच्या तपासाची सविस्तर माहिती ही त्यांनी घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here