दापोली- कोकणातील अनेक प्रतिभावान साहित्यिकांनी मराठी तथा ग्रामीण साहित्य क्षेत्रात फार मोठी कामगिरी केली आहे. कोकणातील प्रथितयश साहित्यिक बाबू घाडीगांवकर यांचे लेखन मी नेहमीच आत्मियतेने वाचत असतो. त्यांचे सर्वच साहित्य मला नेहमी गावाची ओढ लावते अशी प्रतिक्रिया डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे (kokan Vidyapith) शिक्षण विस्तार संचालक डाॅ. संजय भावे यांनी व्यक्त केली. नुकतीच कोकणातील प्रथितयश साहित्यिक बाबू घाडीगांवकर यांनी डाॅ. संजय भावे यांची सदिच्छा भेट घेऊन ‘ बाबा ‘ हा मालवणी बोलीभाषेतील कवितासंग्रह आणि ‘ वणवा ‘ मराठी लघुकथासंग्रह त्यांना सप्रेम भेट स्वरुपात सुपूर्द केला.
ग्रामीण साहित्य, मग ते कोणतेही असो, वाचकाला गावाची, गावच्या मातीची ओढ लावते. बाबू घाडीगांवकर यांच्या’ बाबा ‘ कवितासंग्रहात मालवणी मुलूखाशी, मालवणी संस्कृतीशी नाते अधिक दृढ करणाऱ्या कविता असून ‘ वणवा ‘ या मराठी लघुकथासंग्रहात कोकणात आपल्या सभोवती आढळून येणाऱ्या कथाबीजांवर आधारित काल्पनिक लघुकथा आहेत. बाबू घाडीगांवकर यांचे विविध दैनिक वृत्तपत्रे व नियतकालिकांतून नियमित लेखन सुरू असून त्यांचे अनेक साहित्य वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. आपले साहित्य नियमित वाचणाऱ्या आणि वाचल्यानंतर आवर्जून अभिप्राय पाठविणाऱ्या डाॅ. संजय भावे यांच्यासारख्या वाचकांना प्रकाशित झालेल्या पुस्तकांची प्रत सुपूर्द करण्याच्या निमित्ताने बाबू घाडीगांवकर यांनी त्यांची वरील प्रकाशित झालेली दोन्ही पुस्तके डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डाॅ. संजय भावे यांस सप्रेम भेट दिली. यावेळी डॉ. संजय भावे यांनी बाबू घाडीगांवकर यांच्या लेखनप्रवासाचे कौतुक करून त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.