सिंधुदुर्ग: देवाच्या बागेची बदनामी करणं… लक्षण चांगला “न”सा

0
346

प्रतिनिधी – देवबागचोच – शशांक कुमठेकर

गांव तसं चांगलं, पण…
…… नजरेला खुपलं!!

देवबाग– देशाच्या नकाशावर पर्यटन क्षेत्रातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केलेला सिंधुदुर्ग जिल्हा बाकी सोयी सुविधा देण्यात शासनाकडून तसा अगदीच उपेक्षित राहिला. तरीही, स्थानिक जनतेच्या धडपडीतून अल्पकाळात नावारूपास आलेल्या देवबाग तारकर्ली ह्या मालवण तालुक्यातील निसर्गरम्य अशा समुद्रकिनारी गावाने असे काहीतरी वेगळे करून दाखवले की आज पर्यटन क्षेत्रात त्याचा विशेष उल्लेख होण महत्वाचे होऊ लागले. कुठच्याही सोयीसुविधा नसताना, सरकारचा पुर्णपणे दुर्लक्ष असताना फक्त आणि फक्त “अतिथी देवो भव” ह्या संकल्पनेला पुरक न्याय देऊन स्थानिक रहिवासी लोकांनी उभी केलेली पर्यटनाची गुढी ही कोणालाही खुपणारी अशीच आहे.अवघ्या महाराष्ट्राला सातशेवीस किलोमीटर समुद्र किनारीपट्ट्यातील गावांना आदर्शवत ठरावे असे एक टुरिझम रोल मॉडेल देवबाग तारकर्लीवासीयांनी अगदी तन मन आणि कर्जबाजारी होत खिशातले धन लावून नावारूपास आणले. “यांच्या काळजात भरली शहाळी”चा प्रत्यय देत प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान करणे हा गुणधर्म पिढीजातच रुजलेल्या ह्या माणसांना जेव्हा नाहक एखादं दुसऱ्या अप्रिय घटनेवरून बदनाम करणे म्हणजे भरकटलेल्या मनाची सांजभूल म्हणावी लागेल. राग धरणे हे कोकणी मानसिकतेत कधीच बसले नाही, पण किव करावी तेवढी थोडीच!

देवबागचे हे रुपडे असेच बदललेले नाही. स्थानिकांची मानसिकताही बदलण्यासाठी स्वप्रबोधन गावाला करावे लागलेले आहे. वर्षानुवर्षे शिवशंकराची शांत- अलिप्त साधना अंगात बाणलेले हे गाव एका रात्रीत अचानक कायाकल्प घडलेले नाही. आजही एकाद्याला आलेला अप्रिय अनुभव असू शकतो, नाही कशाला? पण त्याचे मीठ मसाला लावत अवास्तव वर्णन करुन वास्तवता अस्ताव्यस्त आणि उध्वस्त करणे हेच ह्या पोस्टचे उद्दीष्ट असलेले आतून जाणवत राहते.

व्हायरल झालेल्या त्याच “नसा” वाल्या पोस्टची सत्यता पडताळून पाहता त्सुनामी आयलंडवर जर गळ्यापर्यंत पाणी आलेले असेल तर अंदाजे पाच फुटांपर्यंत पाणी वाढले म्हणावे लागेल. असे असते तर साहजिकच देवबाग गांव अर्धाअधिक पाण्याखाली जाईल हे निश्चित. पण पुर्वानुभव पाहता जेव्हा जेव्हा कर्ली नदीला पुर येतो तेंव्हा साधारण ह्याच देवबाग संगमावरून उगमाच्या दिशेने पंधरा ते वीस किलोमीटरच्या पुढे पुराचे पाणी नदीकिनारी गावात शिरते त्यावेळी काही घरे पाण्याखाली जातात.पण ह्याच नदीकिनारी जेमतेम तीन ते चार फुट पाणी वाढुन गाव कधी पाण्याखाली गेलेला नाही. हीच तर निसर्गाची किमया आहे. देवबाग संगमाच्या भुभागाची रचना प्रत्येक पावासाळ्यानंतर बदललेली असते. दोन्ही बाजूला खारे पाणी असुन सुद्धा गावामध्ये गोड्या पाण्याच्या विहिरी असणे हा सुद्धा विज्ञानाचा चमत्कारच होय. माडबागायतीने कायम बहरलेला अथांग अरबी समुद्राच्या सानिध्यातील पांढरा शुभ्र वालुकामय भुभाग इथल्या माणसांच्या पर्यटकांशी सौहार्दपुर्ण वागणुकीनेच दिवसेंदिवस पर्यटकांच्या पसंतीस उतरू लागला. आज पावेतो शिरोडा,वेळागर,रेडी सारखी समुद्र किनारी पर्यटकांच्या पसंतीची पर्यटन स्थळे फाईव्ह स्टार हॉटेल्सना तीस तीस वर्षांची भाडेपट्टी देऊन, त्याला वर आणखी दहा-वीस दशके होऊन पर्यटकांच्या ओघाचा हा पल्ला गाठू शकले नाहीत. पंधरा वर्षांच्या संघर्षात देवबागने मात्र तो गाठला. पर्यटकांच्या समाधानाच्या शिदोरीशिवाय हा प्रवास कसा शक्य होता?

अरुंद रस्त्याची समस्या, खाडीकिनारी व समुद्र किनारी योग्य बंधारा नसल्याने होणारी धुप, गाड्यांची पार्किंग समस्या, सुलभ शौचालयाची समस्या, पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, पर्यटकांचा उच्चांक गाठला की त्यादिवशी हमखास वीजपुरवठा खंडित होतोच. कुठल्याही कंपनीच्या मोबाईल नेटवर्कची वारंवार येणारी समस्या …. म्हण्जे गांव तसं चांगलं,पण समस्येने आणि शासकीय अनास्थेने ग्रासले’ म्हणण्याची वेळ आली आहे. पर्यटनाच्या मूलभूत सुविधेतच एवढ्या टोकाच्या अडचणी असतानाही स्थानिक जनतेने उभा केलेला पर्यटन उद्योग कौतुकास्पदच आहे. त्यातून एखादी अप्रिय घटना वा अपघात घडलाच तर त्याच तत्परतेने करावयाच्या मदतीत गाव तसूभरही कमी पडत नाही. अपघात होत नाहीत असे कुठले पर्यतन क्षेत्र आहे? पण इथे चुका कोणाच्याही असोत, पण स्वतःच्या जीवावर उदार होवून अशावेळी पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी धाव घेतली जाते अशी कित्येक उदाहरणे आहेत. समुद्रस्नानाच्या वेळी पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाण्याच्या तळाशी गेलेल्या पर्यटकांना शेकडो प्रसंगी वाचवले गेले आहे. तुमचा समुद्र आमच्या रंकाळ्यापेक्षा मोठा आहे का असे विचारत पाण्याशी मस्ती करणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी ना शासन पातळीवर इथे गार्ड आहेत, ना मस्ती अंगलट आल्यावर उपचार करण्यासाठी शासकीय आधुनिक वैद्यकीय यंत्रणा! देवबागमुळे पर्यटकांची रेलचेल वाढून व्यापार उदीम वाढला, सिंधुदुर्गला बरकत आली, बदल्यात सरकारी यंत्रणेने काय दिले? इथली वैद्यकीय यंत्रणा अंधारात चाचपडते आहे, पण दोष पर्यटन व्यवसायावर येतोय. अपघातप्रसंगी वेळ पडल्यास अशा बाधित व्यक्तींना हाॅस्पिटल मध्ये दाखल करून औषधोपचाराचा खर्च स्वतःच्या खिशातून करून त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवल्याच्या घटना पण आहेत. संधी सोडलेली नाही.(इथे एक बाब मुद्दाम नमूद करावीशी वाटते, पाहुणा घरी आल्यावर त्याची आपुलकीने विचारपूस करून, त्याच्या खाण्याची तजविज करून, परतीच्या प्रवासाला निघताना त्याला त्याच्या गाडीपर्यंत सोडावयास जातो तो ‘मालवणी माणूस’हे वेगळं सांगायची गरज नाही. ही संस्कृती इथे पर्यटन रुजण्याच्या आधीही होती, आजही आहे.) गावातला रुग्ण असो अथवा अपघातग्रस्त पर्यटक, अशा व्यक्तीना मालवण शहराच्या ठिकाणी हाॅस्पिटलमध्ये नेण्यासाठी ‘ऍक्वामॅजिक ‘ ह्या वाॅटरस्पोर्टस संस्थेने स्व:खर्चाने अ्ॅम्बुलन्स घेत ती सेवेसाठी ठेवली आहे. अगदी मोफत सेवा गेली पाच वर्षे ते देताहेत. त्याचंही कौतुक होणे गरजेचे आहे. त्याच्याच सोबतीला देवबाग ग्रामपंचायत कडुन जिल्ह्यातील पहिल्या देवबाग या ग्रामपंचायतीने स्वतःची अ्ॅम्बुलन्स सेवेसाठी सज्ज केली आहे. खरंत़र देवबाग म्हणजे देवांची बाग असा अर्थ निघत असला तरी देवरुपी माणसांची ही बाग म्हटले तर वावगं ठरणार नाही.अशा संवेदनशील वृत्तीच्या समाजाला आरोपांच्या पिंजऱ्यात कोंडत त्यांचे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न आपल्या एका बदनामीकारक पोस्टने होतो याचा विचार कोणाच्या मनात का येऊ नये? अशा पोस्ट व्हायरल करून शहाणपण शिकवल्याचा आसुरी आनंद मिळेल. एखाद दुसरा वाईट अनुभव आला असल्यास राईचा पर्वत करून स्वत:च्या रागापायी इतरांच्या पोटावर पाय आणण्याचा प्रयत्न करून त्याखाली डाॅक्टर,वकील ह्या सारखी बिरुदावली लिहून ती मिरवण्यापेक्षा एखाद्या भयाण चित्रपटाचे लिखाण त्यांनी करावं. आतिथ्यात फायुस्टारची फॅसिलिटी अवघ्या सहाशे रूपयात ओरबडायची, एका क्रूझमधून कोंबून चाळीस जण येत सुरक्षित असलेल्या कोकणचा गैरफायदा घेत रस्त्यावर, मंदिरात किंवा उघड्यावर कुठेही पथारी पसरायची, तिथेच मलमूत्र विसर्जन करत स्वच्छ भारत अभियांनाची कोकणात येत काशी करायची, रूम घेतली तर एकाच रूममध्ये लटांबर कोंबून स्टोव्ह काढत जेवण शिजवायचं असले चिटूर धंदे करणाऱ्या आपल्या लोकांना हे डॉक्टर, वकील कधी का नाही तत्त्वज्ञान शिकवत? कोकणच्या पर्यटनाचा बोजवारा उडवत आयजीच्या जीवावर बायजी करताना काहीच वाटत नाही का? आज गोव्यासारख्या प्रदेशातून दिवसाला हजारो पर्यटक स्कूबा डायविंगच्या निमित्ताने सिंधुदुर्गात येतात, त्यावेळी कमी बजेट पाहूनच येतात. तसं पाहिलं तर गोवा पर्यटकांचं नंदनवन ! पण गोव्यातून कोकणात पर्यटक आणताना सुविधा नव्हे तर कमीत कमी बजेटवरच बार्गेनींग होते. जरा दर इकडे तिकडे झाले की मग लुटमार दिसते. पण कर्जाचा डोंगर डोक्यावर घ्यायचा, कोविडसारख्या काळात स्वतःला जगवण्याची धडपड करायची, दरवर्षी दरवाज्याच्या कड्या कोयंडे बदलायची (खाऱ्या हवेमुळे करावी लागणारी देखभाल), नाना समस्यांना तोंड द्यायचं आणि मग तशातच एखाद्या घटनेने विरोधात व्हायरल पोस्ट सोशल मीडियावर फिरवल्या जाऊ लागल्या की सरकारने त्याची तातडीने “दखल” घेत व्यवसायाचे एल लावायचे. एरव्ही हे सरकार इतर समस्येकडे एवढ्या तातडीने पहाताना दिसत नाही. आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशा अवस्थेतही समोर येईल त्या परिस्थितीशी झगडून, दक्षता घेत पर्यटकांची सुरक्षित सेवा करण्याचा संकल्प व्यावसायिकांनी केला आहे. येणाऱ्या टुरिझम सिझनमध्ये परत देवबाग तारकर्ली पर्यटनाच्या बाबतीत नव्याने उभारी घेईल हे निश्चितच! ह्या पुढे मुठभर लोकांच्या अतिरेकी मीडिया डंखांचा परिणाम काय होतो हे अनुभवल्यानंतर यापुढे काटेकोर नियम पालन (पर्यटकांना वाईट वाटले तरी गरज म्हणून अपरिहार्यपणे पालन!) सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य हाच मुलमंत्र घेऊन पर्यटनात एका नवनिर्माणाची नांदी पुन्हा गुंजेल यात शंकाच नाही. शेवटी ही पर्यटन गंगा आणण्यासाठी भूमीपुत्रांचे भगीरथ प्रयत्न हे निस्सीम कर्मयोग आहेत आणि कर्मयोग हाच राजयोगाकडे नेत असतो हे ही त्रिकालाबाधित सत्यच आहे, नव्हे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here