प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी– नॅशनल सायक्लॉन रिस्क मिटीगेशन प्रोजेक्ट (एन.सी.आर.एम.पी.) अंतर्गत, किनारपट्टीभागात भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचे काम अद्याप पूर्णत्वाला गेले नसतानाही महावितरणने उर्जामंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणाचा घाट घातला आहे.
भूमिगत वाहिन्या टाकताना व त्यांचे डीपी बसवताना अनेक ठिकाणी सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात वाहणार्या जोरदार वार्यामुळे किनारपट्टी भागात वीज वाहिनीवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार अनेकवेळा घडतात. यावर उपाय म्हणून भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचा निर्णय 2019 मध्ये घेण्यात आला. 15 ऑक्टोबर 2019 ते 14 एप्रिल 2021पर्यंत या कामाची मुदत ठरवण्यात आली. परंतु, कोरोनामुळे या कामाला मोठा फटका बसला. कोरोनाचा कालावधी उलटल्यानंतर पुन्हा कामाला जोमाने सुरुवात झाली. मात्र, खोदाईसाठी लागणार्या परवानगीला होणारा विलंब आणि निधीची कमतरता, यामुळे या वीज वाहिन्या टाकण्याचे काम रडत खडतच सुरू आहे. मार्च 2022 ची अंतिम मुदत असतानाही अद्याप सुमारे 60 टक्केच काम झाल्याचे दिसून येत आहे.
गटारांवर डीपी उभारण्यात आल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. शहरातील किल्ला परिसरात काही वर्षांपूर्वीही भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात आली. मात्र, काही महिन्यातच यातून होणारा वीजपुरवठा बंद झाला. सध्या यातून कोणतीही वीज प्रवाहित नसली तरी रस्त्यावर बसवण्यात आलेले बॉक्स तसेच ठेवण्यात आले आहेत. किनारपट्टी भागातील खार्या हवेमुळे पत्र्याचे हे बॉक्स गंजले असून, त्यांची दुरवस्था झाली आहे. झडपे मोडून पडली आहेत. गंजलेल्या पत्र्याचा काही भाग रस्त्यावरच पडलेला असून, यातून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. नव्या योजनेंतर्गत बसवण्यात येणारे बॉक्सही पत्र्याचेच असल्याने त्याच्या टिकाऊपणाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.


