मुंबई- विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे आजपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनात शक्तिप्रदर्शन होणार आहे. या अधिवेशनात कोणी कोणता पक्षादेश पाळायचा, यावरून शिवसेना आणि शिंदे गटात तीव्र संघर्षांची चिन्हे आहेत.
सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. रविवारी अध्यक्षांची निवड, तर सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. भाजपचे १०६ तर अपक्ष, छोटे पक्ष असे एकूण १२० आमदार भाजपच्या गटात आहेत. शिंदे यांच्याबरोबर अपक्षांसह ४६ आमदार आहेत.
विधानसभेत सरकारला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पािठबा असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. यामुळे भाजपचे नार्वेकर निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही. अध्यक्षपदासाठी नव्या नियमानुसार म्हणजे आवाजी पद्धतीने मतदान होईल. गेल्या डिसेंबरमध्ये महाविकास आघाडी सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदान पद्धतीने घेण्याचा बदल केला होता. या नव्या बदलानुसारच ही निवडणूक होईल. उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव पुकारल्यावर सदस्यांनी उभे राहून मत नोंदवायचे आहे.


