वेंगुर्ला प्रतिनिधी-सुरेश कोलगेकर
विठ्ठल भक्तांच्या सहकार्याने वैकुंठवासी श्रीकृष्ण झांटये यांच्या प्रेरणेतून त्यांच्या मित्रपरिवाराने एकत्र आयोजित केलेल्या वेंगुर्ला ते कालवीबंदर या आषाढी पायी वारीला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो स्त्री-पुरुष भाविकांनी या वारीत सहभागी होत ‘ज्ञानोबा तुकाराम‘च्या जयघोषात कालवीबंदर येथील श्री विठ्ठलरखुमाईचे दर्शन घेतले.
सन २०२० मध्ये म्हणजे कोरोनाकाळात पंढरपूर वारीस बंदी आली होती. विठूरायाच्या दर्शनाची आणि वारीची आस भक्तांना स्वस्थ बसू देईनात. म्हणूनच श्रीकृष्ण उर्फ बाबू झांटये यांनी पुढाकार घेत आपल्या मित्रमंडळी व वारक-यांच्या सहकार्याने वेंगुर्ला ते कालवीबंदर अशी आषाढी पायी वारी सुरु केली. विठ्ठलाच्या कृपेने पहिली वारी यशस्वी झाल्यानंतर दुस-यावर्षीच्या वारीपूर्वी श्रीकृष्ण झांटये यांचे निधन झाले. परंतु, त्यांनी सुरु केलेली त्यांच्या मित्रपरिवाराने बंद न करता ती त्यांच्या पश्चातही सुरु ठेवली. यावर्षी या वारीचे हे तिसरे वर्ष होते. आज सकाळी ७ वाजता वेंगुर्ला दाभोलीनाका येथून
विठ्ठल भक्तांच्या उपस्थितीत वारीला प्रारंभ झाला. विठ्ठलाचे भजन करीत कालवीबंदरच्या दिशेने निघालेल्या या वारीत बहुसंख्य वारक-यांनी सहभाग घेतला. दुपारी २ वाजता ही वारी कालवीबंदरच्या विठ्ठल मंदिरात पोहचली. मंदिरात पोहचताच वारक-यांनी केलेल्या विठ्ठल नामाच्या जयघोषात परिसर भक्तिमय बनला. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलीया । भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद । अशाप्रकारचे भाव प्रत्येक वारक-याच्या चेह-यावर पहायला मिळाले.
फोटोओळी – वेंगुर्ला ते कालवीबंदर या आषाढी पायी वारीत बहुसंख्य भाविकांनी सहभाग घेतला.


