औरंगाबाद वसंतराव नाईक महाविद्यालय येथे “सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त” जिल्हा राज्यस्तरीय कुमार/कुमारी गट कबड्डी स्पर्धा

0
19

औरंगाबाद :- शशिकांत राऊत

ठाणे,पालघर, सांगली,औरंगाबाद, नांदेड,पुणे, मुंबई उपनगर यांची निमंत्रित जिल्हा राज्यस्तरीय कुमारी गट कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी. वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ- औरंगाबाद संचलित वसंतराव नाईक महाविद्यालय – औरंगाबाद “सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त” निमंत्रित जिल्हा राज्यस्तरीय कुमार/कुमारी गट कबड्डी स्पर्धेचे आज पासून आयोजन करण्यात आले आहे. यात कुमार गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत प्रथम आलेल्या १२-१२ कुमार-कुमारी संघांना निमंत्रित करून त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. आज वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर झालेल्या कुमारी अ गटात पालघरने रत्नागिरीला ४५-२५ असे नमवित साखळीत पहिल्या विजयाची नोंद केली. भूमी मोरे, अनिता काटकर यांच्या चौफेर खेळाच्या बळावर पालघरने पहिल्या डावातच ३०-०९ अशी भक्कम आघाडी घेत विजयाचा पाया रचला. दुसऱ्या डावात सावध खेळ करीत या विजयावर शिक्कामोर्तब केले. रत्नागिरीच्या पूजा गावित, जुईली चमकल्या. 

याच गटात ठाण्याने देखील रत्नागिरीला ५०-२५असे पराभूत केल्यामुळे साखळीतच त्यांना गारद व्हावे लागले. देवयानी पाटील, पूजा इंगवले यांच्या चतुरस्त्र खेळामुळेच ठाण्याने ही किमया साधली. पूर्वार्धात २७-११ अशी आघाडी घेणाऱ्या ठाण्याने उत्तरार्धात देखील जोशपूर्ण खेळ करीत हा विजय साकारला. रत्नागिरीच्या सानिका भाटकर, वैष्णवी जाधव बऱ्या खेळल्या. याच गटातील शेवटचा सामना हा ठाणे पालघर असा झाला. तो २५-२५ असा बरोबरीत सुटला. ड गटात नांदेडने बलाढ्य पुणेवर २७-२१ असा पराभव करीत या स्पर्धेत खळबळ उडवून दिली. पहिल्या डावात १४-१३अशी नाममात्र आघाडी घेणाऱ्या नांदेडने दुसऱ्या डावात आपला खेळ थोडा गतिमान करीत ६गुणांनी सामना आपल्या बाजूने झुकविला. सानिका पाटील, अमृता दिवासे, अपर्णा पोवार या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. अनुष्का फुगे, साक्षी गावडे यांनी पुण्याकडून कडवी लढत दिली. याच गटात पुण्याने रायगडला ३६-१२ असे नमवित बाद फेरीतील आपली जागा निश्चित केली. याच गटातील शेवटच्या साखळी सामन्यात नांदेडने रायगडला २५-१६ असा पराभव करीत या गटात प्रथम क्रमांक मिळवीत बाद फेरी गाठली. सानिका पाटील, अर्पणा पोवार, सायली पाटील यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

 कुमारी गटातील इतर निकाल १)मुंबई उपनगर वि वि मुंबई शहर-ब गट(५२-१९); क गट :- १)सांगली वि वि नाशिक(६२-४३); २)सांगली वि वि औरंगाबाद(५२-४०); ३)औरंगाबाद वि वि नाशिक(४३-३०). 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here