वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कौलगेकर
दाभोली शाळा नं. १ च्या इमारत दुरूस्तीचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवल्याने शाळेतील मुलांची गैरसोय निर्माण झालेली आहे. हे काम त्वरीत पूर्ण करून मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे. अन्यथा १५ ऑगस्ट पासून पंचायत समिती कार्यालयासमोर पालक व ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा दाभोली गावातील आजी-माजी लोकप्रतिनीधी, शैक्षणिक हितचिंतक व पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिला आहे. तसेच आंदोलनावेळी आंदोलकांचा राग अनावर होऊन काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास पंचायत समितीचा शिक्षण विभागच जबाबदार राहिल असे निवेदनांत नमुद केले आहे.
दाभोली शाळा नं. १ च्या दुरूस्तीचे काम शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. मात्र या कामावर शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने ते काम अर्धवट राहिल्याने आज शाळा सुरू होऊन सुमारे एक महिना झाला तरी या शाळेत मुलांना बसण्यास जागा नाही. बाजूला असलेल्या अंगणवाडीच्या इमारतीत मुलांना बसवून शिक्षण देण्याचे काम केले जात आहे. मात्र विद्यार्थांना जागा पुरेशी नसल्याने त्रास होत आहे. या शाळेतील विद्यार्थांचे पालकांतून दाभोली गावातील शैक्षणिक हितचिंतक व आजी-माजी लोकप्रतिनीधी यांच्याकडे शाळेच्या अर्धवट कामामुळे होणा-या गैरसोयीबाबत आलेल्या तक्रारीनुसार दाभोली गावचे उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, सदस्य एकनाथ राऊळ, माजी सदस्य नरेश बोवलेकर, माजी पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर, दाभोली शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विवेक परब यांनी गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांची भेट घेऊन दाभोली शाळा दुरुस्तीच्या अर्धवट कामाबाबत मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. हे काम संबधित ठेकेदारांमार्फत त्वरीत करून मुलांना होणारी अडचण व त्रास दुर करावा. अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला पंचायत समितीच्या कार्यालयासमोर पालक, शैक्षणिक हितचिंतक यांचेसह गावातील आजी-माजी लोकप्रतिनीधी तीव्र आंदोलन छेडू असा तोंडी व लेखी इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
दरम्यान, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संफ साधून याबाबतची कल्पना देत सदरचे काम त्वरीत पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
फोटोओळी – अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.