कुमार-किशोर गटाच्या निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजनाचा काही आर्थिक भार राज्य संघटना उचलणार- सचिव आस्वाद पाटील.

0
31
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

मुसळधार पावसाचा इशारा असून देखील राज्य कबड्डी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा व कबड्डी दिन उत्साहात साजरा.

“कुमार व किशोर गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा” आर्थिक अडचणीमुळे या स्पर्धा घेण्यास जिल्हा संघटना किंवा आयोजक पुढे येत नाहीत. याकरिता तो आर्थिक भार थोडा कमी करण्याकरिता एखाद्या खर्चाचा भार राज्य कबड्डी संघटना हलका करणार” असे  सचिव आस्वाद पाटील यांनी एका लेखी सूचनेला उत्तर देताना सांगितले. पुणे, म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मुख्य इमारतीच्या सभागृहात राज्य कबड्डी असो.चे उपाध्यक्ष दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली “६४वी वार्षिक सर्वसाधारण सभा” संपन्न झाली. कबड्डीत सर्वोत्तम खेळाडू घडविण्याकरिता संलग्न जिल्हयात राज्य संघटनेच्यावतीने प्रशिक्षक व फिटनेस ट्रेनर पाठविण्यात येतील. त्याच बरोबर वरिष्ठ व कुमार गटाचे खेळाडू एकत्रित बोलवून वर्षभर छोट्या-छोट्या हप्त्यात त्यांचे प्रशिक्षण घेण्यात येईल. असे देखील त्यांनी एका लेखी सूचनेला उत्तर देताना सांगितले. 

कोरोनामुळे गतवर्षी सभा झाली नव्हती. यंदा दोन वर्षांची वार्षिक सभा घेण्यात आली. संयुक्त कार्यवाह रवींद्र देसाई यांनी सभेपुर्वी दुखवटा व अभिनंदनाचा ठराव मांडला. सभागृहाने अहवाल वर्षात मृत व्यक्तींना दोन मिनिटे स्तब्ध राहून  श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सचिव पाटील यांनी अध्यक्षांच्या परवानगीने विषयसूची प्रमाणे सभेस सुरवात केली. या सभेत वार्षिक अहवाल, मागील इतिवृत्त, जमाखर्च व अंदाज पत्रकास जुजबी चर्चा करून मंजुरी देण्यात आली. सदस्यांच्या आयत्या वेळेच्या प्रश्नांना देखील सचिवांनी समाधानकारक उत्तरे दिली. 

महाराष्ट्राचा कबड्डी दिन उत्साहात साजरा.

 वेधशाळेने मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असून देखील महाराष्ट्राचा कबड्डी दिन मोठ्या उत्साहात पार पडला. दोन-चार पुरस्कारार्थी वगळता इतर सर्व उपस्थित होते. राज्य कबड्डी असो.चे अध्यक्ष विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या अनुपस्थितीत राज्य संघटनेचे उपाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पुरस्कर्थ्याना पुरस्कार वितरित करण्यात आले. मुंबई शहरचा पंकज मोहिते भारतीय रेल्वे संघाच्या सराव शिबिरात असल्याने त्याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. अजितदादा पवार या कार्यक्रमास उशीरा आल्याने त्यांनी सर्व उपस्थितांची दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या हस्ते राज्य व जिल्हा संघटनेच्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. तीन वर्षांच्या पुरस्काराचे वितरण असून देखील कार्यक्रम कोठेही कंटाळवाणा वाटला नाही. त्याचे कारण म्हणजे नेटके आयोजन व समालोचन. या कार्यक्रमाला संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील, उपाध्यक्षा अर्जुन पुरस्कार प्राप्त शकुंतला खटावकर, उपाध्यक्षा नेत्रा राजेशिर्के, सचिव आस्वाद पाटील, परभणीचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. मिलिंद पाटील यांनी आपल्या ओघवत्या वाणीने या कार्यक्रमाचे समालोचन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here