६९व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा अंतिम संघ जाहीर;अहमदनगरच्या शंकर गदई कडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व!

0
39
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

शशिकांत राऊत

मुंबई :- हरियाणा चरखी येथे दि. २१ते २४जुलै २०२२ या कालावधीत होणाऱ्या “६९व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने वरिष्ठ पुरुष गट” कबड्डी स्पर्धेकरिता आज आपला अंतिम संघ जाहीर केला. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पहिल्यांदाच विजेतेपद मिळविणाऱ्या अहमदनगर संघाचा संघनायक शंकर गदई याच्या गळ्यात पहिल्याच वर्षी महाराष्ट्र संघाच्या नेतृत्वपदाची माळ पडली. या संघात अहमदनगर, मुंबई शहर, ठाणे या जिल्ह्यांचे दोन-दोन खेळाडू असून मुंबई उपनगर, नाशिक, रत्नागिरी, नांदेड, रायगड, धुळे यांचा एक-एक खेळाडू आहे. रायगडच्या मयूर कदम कडे गतवर्षाच्या एका राष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव पाठीशी आहे. इतर अकरा खेळाडू अगदी नवखे आहेत. प्रशिक्षक प्रशांत चव्हाण याला वीस वर्षांपेक्षा अधिक काळ कबड्डी खेळाचा अनुभव आहे. उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती होती. आपल्या या खेळातील अनुभवाचा तो प्रशिक्षक म्हणून कासा उपयोग करून घेतो आणि हे नवोदित खेळाडू त्याला कशा प्रकारे सहकार्य करतात यावर महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे. 

हा निवडण्यात आलेला संघ अहमदनगर येथे मॅटवर सराव करीत आहे. हा निवडण्यात आलेला संघ मंगळवार दि.१९ जुलै २०२२रोजी दुपारी मुंबईतील वांद्रे टर्मिनन्स येतून गरीब रथ रेल्वेने स्पर्धेकरिता रवाना होईल. अशी माहिती एका पत्रकाद्वारे राज्य संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी सर्व प्रसार माध्यमाना दिली. महाराष्ट्राचा निवडण्यात आलेला संघ पुढील प्रमाणे. 

पुरुष वरिष्ठ गट संघ :- १)शंकर गदई-संघनायक, २)राहुल खाटीक(दोन्ही अहमदनगर), ३)अक्षय उगाडे, ४)सिद्धेश पिंगळे(दोन्ही मुंबई शहर), ५)अक्रम शेख(मुंबई उपनगर), ६)अस्लम इनामदार, ७)अक्षय भोईर(दोन्ही ठाणे), ८)आकाश शिंदे(नाशिक), ९)शेखर तटकरे(रत्नागिरी), १०)किरण मगर(नांदेड), ११)मयूर कदम(रायगड), १२)देवेंद्र कदम(धुळे).

प्रशिक्षक :- प्रशांत चव्हाण(ठाणे)    व्यस्थापक :- आयुब पठाण (नांदेड)

फिजिओ ट्रेनर :- पुरुषोत्तम प्रभू.

शंकर गदई – संघनायक महाराष्ट्र राज्य कबड्डी संघ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here