सिंधुदुर्ग दि.26: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ व कणकवली येथे उज्जवल भारत- उज्जवल भविष्य महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात नवीकरणीय ऊर्जेचा वापर, ऊर्जा स्त्रोताचे व पर्यावरणतील घटकांचे संवर्धन, महावितरणच्या नैसर्गिक आपत्तीतील कार्य, गत आठ वर्षातील ऊर्जा क्षेत्रातील केंद्र व राज्याच्या योजनांसह ऊर्जेचे भविष्यकालीन 2047 पर्यंतचे नियोजनात अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताच्या क्षमतेतील व वापरातील वाढीबद्दल उपस्थित मान्यवरांनी माहिती देत आपली मते प्रकट केली.
आजादी का अमृतमहोत्सवातंर्गत केंद्रीय ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात ऊर्जा मंत्रालय, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व इतर भागिदार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या दि. 25 ते 30 जुलै 2022 या कालावधीत हा महोत्सव साजरा करण्यात येतो आहे.
तौक्ते, निसर्ग व कोरोना काळातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याची थाप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रजीत नायर (भा.प्र.से.) यांनी दिली. त्याप्रमाणेच गणेशोत्सवात काम करावे, अशी अपेक्षा मा.आ. वैभव नाईक यांनी याप्रसंगीव्यक्त केली. कुडाळला जिल्हा नियोजन समिती सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी निवासी जिल्हाधिकारी मा.श्री. दत्तात्रय भडकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी मा.श्री. दिलीप पवार, आजीपीपीएल एनटीपीसीएल चे उपमहाव्यवस्थापक मा.श्री. विकास सिंग ,कार्यकारी अभियंता श्री.रमेश लोकरे, श्री.विनोद विपर, श्री.बाळासाहेब मोहिते यांची उपस्थिती होती.
ऊर्जा स्त्रोतांसह, वृक्षसंवर्धन, जलसंवर्धनाचे महत्व स्पष्ट करून ती काळाची गरज असल्याचे सांगून केंद्राच्या प्रयत्नांमुळे उर्जा क्षेत्रातील प्रगतीसह नवीकरणीय ऊर्जेच्या क्षमतावाढीबाबत श्री. आरजीपीपीएल एनटीपीसी लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी असिमकुमार सामंता यांनी विशेष उल्लेख केला. विपरीत स्थितीत महावितरण कर्मचारी काम करतात याचा अनुभव नैसर्गिक आपत्ती व कोरोना काळात आल्याचे प्रांताधिकारी मा. वैशाली राजमाने यांनी सांगितले. वीजबचतीचे महत्व त्यांनी विशद केले. कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात संपन्न कार्यक्रमास महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.विनोद पाटील, कार्यकारी अभियंता श्री.रमेश लोकरे, श्री.विनोद विपर, श्री.बाळासाहेब मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. कणकवली येथे ट्रीमॅन व ग्रीन मॅन म्हणून सुपरिचित यांच्या मनोगताने उपस्थितांना खिळवून ठेवले. त्यांनी महावितरण सौर कृषी पंप योजनेतून सौरपंप बसविला आहे.
या महोत्सवासाठी केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्री मा.ना.श्री. नारायण राणे, मा.आ. दिपक केसरकर (सावंतवाडी), मा.खा.विनायक राऊत, मा.आ.निलेश राणे यांनी शुभेच्छा संदेश दिले. कुडाळ व कणकवलीतील कार्यक्रमात ऊर्जा क्षेत्रातील विकास कार्यक्रमाची, ग्राहकाधिकाराबाबतची पोस्टर्स, चित्रफिती प्रदर्शित करण्यात आल्या. विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. कुडाळ येथील रंगखांब नाट्यमंडळ कुडाळ, दत्तमाऊली नाट्य मंडळ सिंधुदूर्ग व महावितरण कर्मचारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य सादरीकरण केले. त्यात प्रामुख्याने कोकणची लोककला दशावतार सादर केली. यात अंधार- असूर, ऊर्जा-देवी यांच्यातील युध्द पंचमहाभुतापासून ऊर्जा देवीस प्राप्त शक्तीचा अविष्कार केला. तसेच मागील तीन पिढ्यांमध्ये ऊर्जावापरामुळे झालेल्या स्थित्यंतरावर नुक्कड नाटक सादर झाले. दोन्ही ठिकाणी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.विनोद पाटील यांनी करून महावितरणकडून जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या योजनांची इंत्यभूत माहिती दिली.
ऊर्जा क्षेत्राचे जाळे विस्तारले :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेतून 55 कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यात मालवण येथे 33/11 केव्ही जीआयएस उपकेंद्र उभारणी केली आहे. वैभववाडी, वाडा, अंदुर्ले, कुंभारमाठ येथे उपकेंद्र रोहित्राची क्षमता वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील ऊर्जा क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी 342 नवीन वितरण रोहित्र उभारणी, 265 किमी उच्च दाब वीज वाहिनी व 213 किमी लघु दाब वीज वाहिनी उभारणीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. शहरी भागातील वीज यंत्रणेच्या बळकटीकरण व विस्तारीकरणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकात्मिक उर्जा विकास योजनेतून 18 कोटी रुपयांची कामे पूर्ण केली आहेत. त्यात प्रामुख्याने 33 नवीन वितरण रोहित्रे तसेच 30 किमी उच्च दाब भूमिगत वाहिन्या व 40 किमी लघुदाब भूमिगत वाहिन्यांची कामे करण्यात आली आहेत. सौभाग्य योजनेतून जिल्ह्यात ग्राहकांना 68 वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. कृषिपंप विजजोडणी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत जिल्ह्यात 14 कोटी 40 लक्ष रुपये निधीतून 229 रोहित्रांची उभारणी करून 229 वीज ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेतून जिल्ह्यात 36 वीज जोडण्या दिलेल्या आहेत.
————————–


