मुंबई: शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरी छापा मारत ईडीने अटक केली आहे. तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने राऊत यांना ताब्यात घेतले आहे. अटकेनतंर राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार आहे. तिथे अटकेची पुढील कारवाई होणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान.संजय राऊत यांची अजूनही चौकशी सुरू आहे. मात्र, राऊत ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांचे वकिल विक्रांत साबणे यांनी राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले नसल्याचे सांगितले आहे.
राऊत यांच्या घरातून ईडी अधिकाऱ्यांनी साडे 11 लाख जप्त केल्याची माहिती आहे. राऊत किंवा त्यांच्या कुटुंबीयांना या रकमेचा स्रोत उघड करता आला नाही. त्यामुळे ईडी याबाबत अधिक तपास करत आहे.
पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण मनी लाँड्रिंगचे आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत आहे. पथकाने संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट सील केला आहे. हा फ्लॅट राऊत यांनी 83 लाख रुपयांना खरेदी केला होता. हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते.
आज सकाळीच ईडी संजय राऊत यांच्या घरी पोहोचली होती. या प्रकरणी संजय राऊत यांना 20 जुलै रोजी ईडीने समन्स बजावले होते, मात्र राष्ट्रपती निवडणुकीतील व्यस्ततेमुळे ते एजन्सीसमोर हजर झाले नाहीत. त्यांच्या वकिलांमार्फत त्यांनी 7 ऑगस्टपर्यंत मुदत मागितली होती. ईडीने ही विनंती फेटाळून 27 जुलै रोजी पुन्हा समन्स बजावले होते. यावेळीही संजय राऊत पोहोचले नाही. त्यानंतर आज ईडीचे पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या चौकशी दरम्यान 4 टविट केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, तरीही शिवसेना सोडणार नाही, महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन असे टविट खासदार संजय राऊत यांनी केले आहे.


