सिंधुदुर्ग  : प्रेमास नकार दिल्याच्या रागातून वेंगुर्ले-मठ येथील सायलीचा खून…

0
39

मैत्रिणीच्या पतीकडूनच प्रकार; १२ तासात आरोपी गजाआड; वेंगुर्ले पोलिसांचे कौतुक…

वेंगुर्ले : प्रतीनिधी

प्रेम संबंध नाकारल्याच्या रागातून वेंगुर्ले येथे खून प्रकरण घडल्याचे समोर येत आहे. तालुक्यातील मठ-कणकेवाडी येथील सायली यशवंत गावडे हिचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या मैत्रिणीच्या पतीला ताब्यात घेतले आहे. तर अन्य दोघांची सुद्धा चौकशी करण्यात आली. हा प्रकार काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास उघड झाला होता. दरम्यान १२ तासांच्या आत आरोपीला गजाआड करणाऱ्या पोलिसांचे कौतुक होत आहे.

कुडाळ येथील एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून सायली काम करत होती. ती रोज सायंकाळी घरी यायची. मात्र दोन दिवसापूर्वी ती कामावरून घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलीस ठाण्यात नापत्ताची नोंद करण्यात आली होती. तर तिचा शोध सुरू असतानाच काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका युवकाला तिचा मृतदेह काजू बागेत संशयास्पद रित्या आढळून आला. त्याने याबाबतची खबर पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली. यावेळी तो मृतदेह बेपत्ता सायलीचा असल्याचे उघड झाले. त्यानंतर याबाबतची कल्पना तिच्या नातेवाईकांना देण्यात आली. दरम्यान मृतदेहावर संशयास्पद खुणा आणि जखमा आढळून आल्या होत्या. त्यावरून तिचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला होता. त्या दृष्टीने तपास सुरू असताना संशयित म्हणून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यात एक तिच्या मैत्रिणीचा पती होता. त्याने प्रेम संबंधाला नकार दिल्याच्या रागातून हे गैरकृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. परुळे येथील गोविंद दाजी माधव असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव, ओरोस येथील पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घाग यासह पुन्हा अन्वेषण शाखेची टीम करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here