सावंतवाडी- सिंधुदुर्ग आता भयमुक्त झाला आहे. त्यामुळे निगेटिव्हिटी सोडून राजकीय मतभेद विसरून सर्वांनी पॉझिटिव्ह विचारांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करू, जिल्ह्याचा न झालेला विकास हाच आता आमचा शत्रू असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. ते आपल्या सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
आगामी निवडणुका शिवसेना -भाजप युती म्हणूनच लढवण्यात येतील. त्याचा फॉर्म्युला वरिष्ठ स्तरावर ठरेल, त्याप्रमाणे पुढील भूमिका घेऊ, असेही त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पॉझिटिव्ह अँगलने राजकीय काम केले जाते हाच अँगल आता सिंधुदुर्ग विकासासाठी आवश्यक आहे. सर्वसामान्य माणसाला विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाप्रमाणे काम करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सातत्याने केंद्र सरकारवर टीका करून राज्यमागे गेले त्यामुळे आता पॉलिसी बदलावी लागेल, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.