पी. एम. किसान पोर्टलवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. अद्यापही जिल्ह्यातील 62 हजार शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी केलेली नाही. अशा सर्व शेतकऱ्यांनी 7 सप्टेंबर पर्यंत आपली नोंदणी करावी त्याशिवाय पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ मिळणार नाही. तसेच सुट्टीच्या दिवशीही केंद्र सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये आपली ई-केवायसी प्रक्रिया करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. पी. एम. किसान योजने अंतर्गत 7 सप्टेंबर 2022 पूर्वी योजनेतील पात्र सदस्य यांची पी. एम. किसान या योजनेची ई-केवायसी प्रक्रीया पूर्ण करावी. अन्यथा पी. एम. किसान योजनेतील पात्र लाभार्थी यांना या योजनेचे पुढील लाभ ( वार्षिक 6000 रूपये मात्र ) मिळणार नाही.
ई-केवायसी प्रक्रीया पुर्ण करण्यासाठी आधार क्रमांक आणि आधार सलग्न मोबाईल नंबर ही माहीती आवश्यक आहे. आधार सलग्न मोबाईल नंबर नसल्यास नजीकच्या केंद्रातून बायोमेट्रीक मशीनद्वारे ई-केवायसी पुर्ण करता येईल. सदरील ई-केवायसी प्रक्रीया आपल्या ग्रामपंचायती मधील आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमार्फत चालू आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 62 हजार 300 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित असून सदर व्यक्तींची यादी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करण्यात आली आहे. यापुढे या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी 07 सप्टेंबर 2022 पूर्वी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधून सदरची प्रक्रिया पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे


