सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तत्परतेने आणि जलदगतीने सुविधा उभारण्याचे काम करत आहेत, याचे समाधान आहे. माझे कुटुंब – माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून नक्कीच कोवीडवर मात करता येणार आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन लोकांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा व निधी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
राज्यातील औषधांचा पुरवठा सुरळीत होईल पण सध्या महत्त्वाची गरज आहे ती ऑक्सिजनची. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील याची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी होत आहे. ही चांगली बाब आहे.यावेळी जिल्हा खनिकर्म निधीमधून घेण्यात आलेल्या 6 रुग्णवाहिका, 50 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यांचेही लोकार्पण करण्यात आले.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रस्तावना केली, तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याला सध्या 4 टन ऑक्सिजन पुरवठा होत आहे. त्यामध्ये आणखी 2 टन वाढ करून जिल्ह्याला 6 टन ऑक्सिजन पुरवठा करावा तसेच एसडीआरएफचा निधीही सिंधुदुर्गला लवकर मिळावा अशी मागणी केली. नॉन कोविड रुग्णांसाठीही ऑक्सिजनचे नियोजन करावे.
जिल्ह्यात सध्या माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येत आहे. त्या माध्यमातून कोरोना रुग्णांचा शोध घेतला जात असल्याचे पालकमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासन मिळून कोविडचा सामना करत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी केले.