महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे पवित्र कार्य जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे करीत आहेत. शिक्षकी पेशा प्रामाणिकपणे करीत असतानाच विविध कलागुण जोपासणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा मला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रवेश व नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांनी दापोली येथील एका अनौपचारिक कार्यक्रमात बोलताना काढले.
दापोली तालुक्यातील चंद्रनगर शाळेत विषय शिक्षक म्हणून काम करीत असलेले बाबू घाडीगांवकर त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी विविध भाषिक व गुणवत्तापूर्ण उपक्रम अविरत राबवित आहेत. शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावीत असतानाच ते विविध नियतकालिकांतून, दैनिकांतून ललितलेखन व काव्यलेखन करीत आहेत. त्यांचा ‘ बाबा ‘ हा कवितासंग्रह व ‘ वणवा ‘ हा लघुकथासंग्रह मला आताच सप्रेम भेट स्वरुपात मिळाला आहे. अशा प्रकारे विविध कलागुण जोपासणाऱ्या शिक्षकांचा मला अभिमान वाटतो असे जे.पी. डांगे यावेळी म्हणाले.
यावेळी दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी दापोली पंचायत समिती राबवित असलेल्या ‘ व्हिजन दापोली ‘ या तालुक्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणाऱ्या व प्राथमिक शाळेतील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती जे.पी. डांगे यांना दिली.
यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून ‘ व्हिजन दापोली ‘ नावाचा एक महत्वाकांक्षी उपक्रम राबवित असल्याची माहिती मला आता मिळाली आहे. या उपक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक विकासासाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळा व स्पर्धांचे नियमितपणाने आयोजन करण्यात येत असल्याचेही माझ्या वाचनात आले आहे. या उपक्रमाचे फलित म्हणून शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. ही खरोखरच प्रशंसनीय व गौरवास्पद बाब आहे. येथील ‘ व्हिजन दापोली ‘ उपक्रमाचा प्रसार व प्रचार संपूर्ण महाराष्ट्रात व्हावा असे यानिमित्ताने सांगावेसे वाटते असेही जे.पी. डांगे यावेळी म्हणाले.
यावेळी जे. पी. डांगे यांचेसोबत महाराष्ट्र राज्य परीक्षा नियामक प्राधिकरणाचे कक्ष अधिकारी एस. के. कविठकर, दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव उपस्थित होते. यावेळी बाबू घाडीगांवकर यांनी त्यांनी लिहीलेली ‘ बाबा ‘ व ‘ वणवा ‘ ही दोन पुस्तके त्यांना सप्रेम भेट स्वरुपात दिली.


