स्थानिक व परप्रांतीय खलाशी वर्ग तसेच क्रियाशील मासेमारे यांना क्यूआर कोडेड पीव्हीसी आधार कार्ड ओळखपत्रे देण्याच्या दृष्टीने दि.11 ऑक्टोबरपर्यंत कार्डासाठी घेऊन कार्ड वितरीत करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधितांनी विहीत कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सिंधुदुर्ग-मालवणचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.) र.ग.मालवणकर यांनी केले आहे.
मासेमारी नौकेवरील कार्यरत नौका मालक, तांडेल, स्थानिक व परप्रांतीय खलाशी तसेच नव्याने आलेले तांडेल व खलाशी यांचे अर्ज तात्काळ सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.) कार्यालयात जमा करावे. जेणेकरुन प्रादेशिक आधार ओळख पत्रे कार्यालय यांच्या साॕफ्टवेअरव्दारे अपलोड करुन देणे सोयीचे होईल. ज्या नौका मालक,तांडेल,स्थानिक व प्ररप्रांतीय खलाशी यांचे अर्ज अपलोड होणार नाहीत, त्यांना दि. 11 ऑक्टोबरपासून समुद्रामध्ये मासेमारी करिता सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जाता येणार नाही. याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने वातावरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे समुद्रात मासेमारी करणाऱ्या सर्व नौकांची काटेकोर तपासणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने कार्यक्षेत्रातील सागरी मासेमारी करणाऱ्या उर्वरित नौका मालक, तांडेल, खलाशी तसेच नव्याने आलेले तांडेल व खलाशी यांना नवीन आधार ओळखपत्र उपलब्ध करुन देण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येणार आहे. मासेमारी नौकेवरी कार्यरत नौकामालक, तांडेल व खलाशी यांना सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने क्यू आर कोडेड पीव्हीसी आधार कार्ड ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. संस्थेमार्फत प्राप्त अर्ज व त्याचा गोषवारा नोडल अधिकाऱ्यांमार्फत प्रादेशिक आधार ओळखपत्रे कार्यालय यांच्या साॕफ्टवेअरव्दारे अपलोडही करण्यात येणार आहे


