रत्नागिरी : कसबा येथील पन्नासहून अधिक प्राचीन मंदिरे जतन करणे काळाची गरज

0
18

संगमेश्वर- संगमेश्वर गावाला ऐतिहासीक महत्व आहे. छत्रपती शंभूराजांची दुदैवी कैदेचा प्रसंग उभा याच परिसरातील आहे. याच वाड्यामागे गर्द झाडीत अनेक प्राचीन मंदिरे स्थापत्य कलेच्या वैभवशाली कारकीर्दीची साक्ष देत उभी आहेत. पन्नास-साठ मंदिरे कसबा परिसरातील गर्द झाडीत उभी आहेत. ही सर्व मंदिरे वेगवेगळ्या धाटणीची असून, त्याचे खास वैशिष्ट्य आहे. त्याचे पर्यटनदृष्टीने जतन करणे आवश्यक आहे, असे अभ्यासक महेश कदम यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कातळशिल्प, लेणी, किल्ले, मंदिरे यांचा अभ्यास करणार्‍या श्री. कदम यांनी कसबा परिसराला भेट दिली होती. तेथे आढळलेल्या विविध मंदिरांची रचना पाहिल्यानंतर त्याचे ऐतिहासीक महत्त्वही त्यांनी अभ्यासले आहे. या परिसरात शंकराची सर्वाधिक मंदिरे आहे. त्याचाही अभ्यास करणे गरजेचे असल्याचे श्री. कदम यांनी सांगितले. कसबा येथे काही वास्तू सुमारे एक हजार वर्षांपासून आपले अस्तित्व टिकवून आहेत. येथील सरदेसाई वाड्याच्या मागे गर्द झाडीत अनेक प्राचीन मंदिरे स्थापत्य कलेच्या वैभवशाली कारकीर्दीची साक्ष देत उभी आहेत. मंदिरावर वाद्यवृंद, देवांचे युद्धप्रसंग कोरले आहेत. सध्या याचे कोरीव नक्षीदार दगड निखळत असून, झाडाझुडपांनी शिखराला विळखा घातला आहे. कित्येक वर्ष घाम गाळून उभारलेले हे शिल्पवैभव, निसर्गकोप व मानवी उदासिनतेमुळे काळाच्या ओघात नष्ट होत आहेत. ही समृद्ध कला आजच्या युगात आपण निर्माण करू शकणार नाही; परंतु जी आहे त्याचे योग्यरित्या जतन व संवर्धन तर नक्कीच करू शकतो.
सोनवी, शास्त्री आणि अलखनंदा या तीन नद्यांच्या संगमामुळे संगमेश्वर नाव पडले आहे. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असणारे ’कर्णेश्वर’ हे या परिसरातील भव्य मंदिर आहे. त्याची निर्मिती पांडवांनी अज्ञातवासात असताना आपला मोठा भाऊ ’कर्ण’ याच्या स्मरणार्थ केल्याची प्रचलित कथ आहे. परंतु मध्य भारतातील बलशाली ’कलचुरी’ घराण्यातील राजा लक्ष्मीकर्ण उर्फ कर्ण (इ.स 1041 ते इ.स 1073) याने या मंदिराची उभारणी केली असावी. या कर्ण राजास भारतीय नेपोलियन असे म्हणतात. त्याने मध्यप्रदेशात अमरकंटक येथे अशीच मंदिर समूह रचना केलेली आहे. हे घराणे काशी येथील भगवान शिवाचे निस्सिम भक्त असल्याने, त्यांनी कोकणात दक्षिण काशी निर्माण करण्यासाठी, तीनशे साठ मंदिराची निर्मिती केली असे म्हटले जाते. त्यातील पन्नास-साठ मंदिरे आजही कसबा परिसरातील गर्द झाडीत कशीबशी तग धरून उभी आहेत. यामध्ये काशीविश्वेश्वर, सोमेश्वर, दालेश्वर, संगमेश्वर, पाताळेश्वर ही मंदिरे आहेत. यातील काही मंदिरे राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव या सत्ताधिशांच्या काळातील असण्याचीही शक्यता श्री. कदम यांनी वर्तविली आहे.
कसबा संगमेश्वर परिसरातील ऐतिहासिक मंदिरामुळे, हा भाग पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यास वाव आहे. मंदिर परिसराची स्वच्छता करून, झाडेझुडपे तोडून तेथे जाण्यासाठी रस्ता करणे, माहिती व मार्गदर्शक फलक लावणे गरजेचे आहे. पुरातत्व विभाग व स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेवून हे केल्यास, ऐतिहासिक कसबा गावाचे महत्त्व वाढून पर्यटनास नक्कीच चालना मिळेल, असे श्री. कदम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here