सिंधुदुर्ग – मालवण तालुक्यातील देवबागच्या समुद्रात मच्छिमारी करून किनाऱ्यावर परतणाऱ्या एका मच्छिमारी नौकेला समुद्राच्या अजस्त्र लाटांनी तडाखा दिल्याने नौका उलटून बुडाली.
या दुर्घटनेत देवबाग येथील विष्णु बळीराम राऊळ (वय-५५) हे बेपत्ता झाले आहेत. या नौकेतील गौरव राऊळ आणि गंगेश राऊळ या दोघांना वाचविण्यात यश आले आहे. आज, सोमवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याबाबतची माहिती पोलीस पाटील येरागी यांनी दिली आहे. दरम्यान, गेले काही दिवस समुद्राला उधाण आहे. वादळी वारे वाहत असल्यामुळे समुद्र खवळलेला आहे. अजस्त्र लाटा उसळत आहेत. परिणामी मच्छिमारांनी मासेमारीला जावू नये, असे आवाहन मत्स्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे.
मागील आठवड्यात समुद्रातील ही परिस्थिती लक्षात घेऊन देवगड समुद्र किनारी अनेक परराज्यातील नौका विसावल्या होत्या. असे असताना स्थानिक मच्छीमार समुद्रात रिस्क घेऊन जातात. त्याचा फटका त्यांना बसत आहे.


